मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मनमानी चालू देणार नाही : रामदास आठवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athavale
मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मनमानी चालू देणार नाही!

मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मनमानी चालू देणार नाही : रामदास आठवले

मुंबई : मशिदींवरील भोंगे कोणी जबरदस्तीने उतरवण्यासाठी पुढे येतील तर त्यांना रोखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे भीमसैनिक पुढे उभे राहतील. संविधानाचे राज्य असून इथे कुणाची मनमानी आम्ही चालू देणार नाही, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

३ मे रोजी ईद असल्यामुळे भोंग्यांना हात लावणार नाही; परंतु ४ मे रोजी ते काढणार, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरे यांची ही भूमिका संविधानविरोधी आहे. रिपब्लिकन पक्ष मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करील. पोलिसांनीसुद्धा रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन आठवले यांनी केले आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील व्यक्तींनीही संयम पाळावा. आक्रमक उत्तर देऊन अधिक तेढ निर्माण होईल अशी भूमिका कोणीही घेऊ नये, असे आवाहनही आठवले यांनी केले आहे. समाजात शांतता-बंधुता-सौहार्द टिकवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा सदैव पुढाकार राहिला आहे असेही ते म्हणाले.

येत्या १० मे रोजी पदोन्नतीमध्ये एससीएसटीसाठी आरक्षण द्या, २०१९ च्या निवडणुकीत मतदान केलेल्यांच्या झोपड्यांना कायदेशीर मान्यता द्या, भूमिहिनांना पाच एकर जमीन कसण्यासाठी द्या, १९९० च्या कटऑफ डेटमध्ये वाढ करून १४ एप्रिल २००० पर्यंतचे गायरान जमिनीवरील भूमिहीन मागासवर्गीयांचे अतिक्रमण कायदेशीर करावे, आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे राज्यभर प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचे आदेश रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना दिले.

२८ मे रोजी शक्तिप्रदर्शन
२८ मे रोजी रिपब्लिकन पक्षाचा मुंबई प्रदेशचा प्रचंड मेळावा चुनाभट्टीतील सोमय्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे २५ नगरसेवक निवडून आणण्यासाठी तयारीला लागा. मुंबईत रिपब्लिकन पक्ष कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असा इशारा देण्यासाठी येत्या २८ मे रोजीच्या मुंबई प्रदेशच्या प्रचंड रिपब्लिकन मेळाव्यात पक्षाचे शक्तिप्रदर्शन घडवा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80978 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top