
खारघरमध्ये सोने खरेदीसाठी गर्दी
खारघर, ता. ३ (बातमीदार) : अक्षय्य तृतीयानिमित्त सोने खरेदी शुभ मानले जाते. त्यामुळे खारघरसह पनवेल तालुक्यात सराफा दुकानांत मोठी गर्दी होती.वाढती गर्दी पाहून दिवसभरात जवळपास दोन ते अडीच कोटींची उलाढाल होईल, अशी शक्यता शहरातील ज्वेलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वर्तवली.
खारघर शहरात ५० हून अधिक सराफा दुकाने आहेत. कोरोनानंतर पुन्हा रुळावर येत असलेले जनजीवन, नोकरी व्यवसाय स्थिरस्थावर होऊ लागल्याने यंदा अक्षय्य तृतीयेला बाजारपेठांत खरेदीला उधाण येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. लग्नसराईचा हंगाम, सोन्याचे भाव स्थिर असल्याने अनेकांनी सोने खरेदीचा मुहूर्त साधला. मंगळवारी २२ कॅरेट-सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम) ४९, ५४० रुपये असून यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळल्याचे सफारा दुकानदारांकडून सांगण्यात आले. सोने खरेदी बरोबरच वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदीसाठी शोरूम आणि मॉलमध्ये गर्दी होती.
दोन वर्षे कोरोनामुळे सराफा बाजारात मंदीचे वातावरण होते. यंदा ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भावात घट झाली आहे. खारघरमध्ये पन्नासहून अधिक सराफा दुकाने असून जवळपास दोन ते अडीच कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.
- प्रकाश कुमार प्रजापती, अध्यक्ष, ज्वेलर्स वेल्फेअर असोसिएशन, खारघर
नवीन पनवेल, खांदा कॉलनीत अल्प प्रतिसाद
नवीन पनवेल, खांदा कॉलनी, आदई, सुकापूर, विचुंबे आदी परिसरात गेल्या काही वर्षात सराफाच्या दुकानात वाढ झाली असून शंभरहून अधिक दुकाने आहेत. उन्हाचा पारा वाढल्याने अनेकांनी सायंकाळी सराफा दुकानांमध्ये गर्दी केली. सध्या सोने खरेदीचे प्रमाण कमी असले तरी रात्रीपर्यंत मोठी उलाढाल होण्याची शक्यता असल्याचे येथील एका सराफा दुकानदाराने सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80980 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..