मान्सूनपूर्व कामांना मिळणार गती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मान्सूनपूर्व कामांना मिळणार गती!
मान्सूनपूर्व कामांना मिळणार गती!

मान्सूनपूर्व कामांना मिळणार गती!

sakal_logo
By

ठाणे, ता. ४ : दरवर्षी पावसाळ्यात शहरांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडत असतात. शिवाय रस्त्यांवर खड्डे पडून अपघाताची संख्या वाढते. त्यामुळे यंदा ठाणे जिल्ह्यातील मान्सूनपूर्व करायची सर्व कामे वेळच्या वेळी पूर्ण करून आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या महामार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर पावसाळ्याच्या कालावधीत खड्डे पडून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याबरोबरच वाहनचालक आणि प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी खड्डे पडणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी खड्डे बुजविण्यासाठी एक पथक तैनात करण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रांना दिले आहेत.
जिल्ह्यातील महापालिका, पोलिस, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसईबी, रेल्वे, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन अशा सर्वच यंत्रणांसोबत घेतलेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
पालिका स्तरावर अनेक विकासकामे सुरू असून त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. ही कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करा, मेनहोल उघडी राहू नयेत, ड्रेनेज लाईनवर झाकणे असावीत, रस्त्यावरील झाडांची आधीच छाटणी करावी, अशा सूचनादेखील शिंदे यांनी यावेळी दिल्या. तसेच ज्या ज्या रस्त्यावर कोणत्याही कारणामुळे खड्डे पडले असतील, नालेसफाई अर्धवट राहिली असेल ती तातडीने पूर्ण करा, असेही निर्देश दिले. शहरांतर्गत रस्ते आणि पुलांची सद्यस्थिती आणि त्यांची दुरुस्ती यांचा आढावाही त्यांनी या बैठकीत घेतला. बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे पालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासह सर्व महापालिकांचे आयुक्त, सिडकोचे सह-व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, कोकण विभागाचे विशेष महानिरीक्षक संजय मोहिते, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीन सिंग, मिरा भाईंदरचे पोलिस आयुक्त सदानंद दाते, ठाणे पोलिस अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे, ठाणे ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अधिकाऱ्यांनी दिली माहिती
ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, पनवेल आणि भिवंडी या महानगरपालिकांच्या आयुक्तांनी आपापल्या पालिका क्षेत्रांत मान्सूनपूर्व तयारी कशाप्रकारे करण्यात आली आहे, याची माहिती दिली. यात प्रामुख्याने आपत्कालीन कक्ष उभारणे, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवणे, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करणे, बोटी, पाणबुडे, बचाव पथक, पाणी उपसण्यासाठी वापरायचे पंप, फोगिंग मशिन्स, निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणारी औषधे, तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या जागा, अग्निशमन दलाची सज्जता असे सर्व उपाय केल्याचे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80981 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top