
शेअर रिक्षा भाड्यात लूट
तुर्भे, ता. ३ (बातमीदार) : घणसोली परिसरात नागरीकरण वाढल्याने ठिकठिकाणी रिक्षा तळ उभारले आहेत; मात्र शेअर रिक्षा केल्यानंतर प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात आहे. यामुळे परिसरात प्रवाशांची लूट होत असल्याचे दिसून येत आहे. यावर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
प्रवासी वाहतूक करताना भाडे योग्य असावे ही अपेक्षा असते. राज्य सरकारच्या परिवहन विभागाकडून रिक्षाने किमान दीड किलोमीटर अंतर पार केल्यावर २१ रुपये दर आकारला जातो, परंतु घणसोली परिसरात शेअर रिक्षाने किमान एक किलोमीटरच्या अंतरात नियमाने तीन प्रवासी बसवल्यास ४५; तर अवैधपणे दोन प्रवासी जादा बसवल्यास ७५ रुपयांची कमाई होते. त्यामुळे अधिकृत प्रवासी वाहतूक केल्यास दिवसाकाठी चांगले उत्पन्न मिळत आहे. रिक्षाचालक मनमानीप्रमाणे वाहतूक करून प्रवाशांना लुटत असल्याचे वास्तव आहे.
घणसोली परिसरात मीनाताई चौगुले रुग्णालय ते रेल्वे स्थानक, घणसोली विठ्ठल मंदिर ते ऐरोली सेक्टर सहा ते आठ, गावदेवी मंदिर ते घणसोली रेल्वेस्थानक, घणसोली डीमार्ट ते रेल्वे स्थानक यादरम्यान शेअरिंग रिक्षा धावत असतात. या सर्व रिक्षा स्टॅण्डपासून घणसोली रेल्वे स्थानक एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतर नाही; तर ऐरोली सेक्टर सहादेखील जास्त अंतरावर नाही, परंतु या सगळीकडे किमान पंधरा रुपये इतके प्रवास भाडे आकारले जात आहे; तर दुसरीकडे घणसोली रेल्वे स्थानक ते एनएमएमटी आगार दरम्यानसुद्धा यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. यामुळे प्रवासी वैतागले आहेत.
सहा प्रवासी वाहतूक
घणसोली येथून सकाळी व संध्याकाळी पावणे, महापे एमआयडीसी परिसरात रिक्षा मोठ्या प्रमाणात धावतात. या ठिकाणी जाणाऱ्या रिक्षांमध्ये पाच ते सहा प्रवासी भरलेले असतात. तीन प्रवाशांची क्षमता असताना जास्त प्रवासी भरले जाऊन सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुकीवर कारवाई केली जाईल. तसेच अवैध रिक्षा स्टँडवर कारवाई केली जाईल. तसेच शेअरिंग भाड्यांसंदर्भात कार्यालयात माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.
- हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80983 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..