
पनवेल महापालिका मुख्यालयाची पायाभरणी
पनवेल, ता. ३ (बातमीदार) : पनवेल महापालिका मुख्यालयाच्या इमारतीची मंगळवारी अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर कोणताही गाजावाजा न करता पायाभरणी करण्यात आली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त व उपायुक्तांच्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. श्रेयवादासाठी हा कार्यक्रम घाईत उरकण्यात आल्याची चर्चा पनवेलमध्ये आहे.
नवीन पनवेल, सेक्टर १६ मधील भूखंडावर महापालिकेचे मुख्यालय बांधण्यात येणार आहे. मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम तळघर, तळमजला व ६ मजले असे असून मुख्य सभागृहाची आसनक्षमता २२४ आहे. याशिवाय २ समिती सभागृह व एक बहुउद्देशीय हॉल आहे. यामध्ये १८३ चारचाकी वाहने व १,११३ दुचाकी वाहने उभी करण्याची क्षमता असेल. यासाठी अंदाजे ११० कोटी खर्च अपेक्षित असून कामाचा ठेका हर्ष कन्स्ट्रक्शनला देण्यात आला आहे.
मंगळवार मुख्यालयाच्या भूमिपूजनप्रसंगी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, स्थायी समिती अध्यक्ष नरेश ठाकूर, प्रभाग समिती अ अध्यक्षा संजना कदम, प्रभाग ब अध्यक्षा प्रमिला पाटील, प्रभाग क अध्यक्षा अरुणा भगत, प्रभाग ड अध्यक्षा अॅड. वृषाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, हरेश केणी, गणेश कडू, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कटेकर उपस्थित होते.
अक्षय्यतृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या मुहूर्तावर मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महापालिकेची मुदत संपत असल्याने महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात जाईल आणि कामाचे श्रेय घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेत्यांच्या हस्ते कार्यक्रम करण्यात येईल, म्हणून हे भूमिपूजन घाईघाईने केल्याची चर्चा पनवेलमध्ये सुरू आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील महापालिका मुख्यालय, महापौर बंगला, प्रभाग समिती कार्यालयासह इतर मोठ्या प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यांच्या संपर्कात आहोत. कार्यक्रमासाठी त्यांची वेळ मागितली आहे. पाया खोदण्याच्या कामाला पावसाळ्यात अडचण येऊ नये म्हणून छोटेखानी कार्यक्रम करून पायाभरणी केली.
- डॉ. कविता चौतमोल, महापौर, पनवेल
विरोधी पक्षनेत्यांना कार्यक्रमाबाबत रात्री कळविण्यात आले होते. वैयक्तिक आमंत्रण नव्हते. प्रशासनाचा कार्यक्रम वाटला म्हणून आम्ही आलो. इतक्या घाईघाईने कार्यक्रम करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत पुढील महासभेत नक्कीच जाब विचारणार आहे.
- गणेश कडू, नगरसेवक, शेकाप
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81001 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..