
पारा उतरला, तरी झळ कायम!
ठाणे - ठाण्यात (Thane) ४४ अंशांवर गेलेला पारा (Temperature) आठवडाभरापासून ३८ अंशांवर स्थिरावला आहे. असे असले तरी अंगाची काहिली करणारा उकाडा मात्र कायम असून, घामाच्या धारा वाहत असल्याचा अनुभव ठाणेकर घेत आहेत. त्यामुळे मे महिना आणखी तापदायक जाण्याची भीती व्यक्त होत आहे. आता पाऊस (Rain) कधी पडतो आणि गारवा पसरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मार्चमध्ये आलेली उष्णतेची लाट अधूनमधून उसळी मारत असल्याचा अनुभव ठाणेकर घेत आहेत. त्यामुळे कधी नव्हे तो ठाण्याचा पारा ४४ अंशपार झाला. एप्रिलचे काही दिवस अपवाद सोडले तरी तापमान ४० अंशांच्या वरच होते. त्यामुळे दैनंदिन कामे करताना चाकरमानी घामाघूम होत होते. स्वयंपाकघरात उभे राहणेही गृहिणींसाठी मुष्कील झाले होते. एसी, कूलर, पंख्याची हवाही लागत नसल्याने नागरिक हैराण झाले होते.
आता पारा उतरल्यानंतरही परिस्थिती मात्र तीच आहे. दुपारी १२.३० ते ३.३० वाजेपर्यंत सूर्य आग ओकत असल्याने तापमानात वाढ होत आहे. दुपारी अंग भाजून निघत असल्याचा अनुभव येत आहे. दिवस-रात्र उकाडा कायम राहत असल्याने मे महिना आणखी किती तापदायक ठरेल, या भीतीने आणखी घाम फुटत आहे.
लग्नसराई तापदायक
सध्या लग्नाचे, साखरपुडा, गृहप्रवेशांचे मुहूर्त आहेत. त्यामुळे कोरोनानंतर दोन वर्षांनी आलेला हा योग साधण्यासाठी सर्वत्र लग्नसराईचा धडाका सुरू आहे; मात्र ऐन उकाड्यात उडणारे लग्नाचे बार वऱ्हाडींसाठी तापदायक ठरत असल्याचे दिसत आहे. परिणामी एसी हॉलला मागणी वाढत आहे.
तापमानाचा चढ-उतार
तारीख कमाल किमान
३ मे ३८.०१ २९.०८
२ मे ३७.०९ २९.०९
१ मे ३८.०५ २९.०७
३० एप्रि. ३८.०९ २९.०८
२९ एप्रि. ३९.०२ ३०.०३
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81004 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..