
कृषीभूषण पुरस्कारावर शेतकऱ्यांची नाराजी
वाडा, ता. ३ (बातमीदार) ः गालतरे येथील गोवर्धन इको व्हिलेजचे प्रमुख सनतकुमार प्रभुजी यांना यंदाचा राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार मिळाला. नाशिक येथे सोमवार रोजी (ता. २) झालेल्या एका समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला; मात्र या पुरस्कारावर अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून याचा निषेध नोंदवला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी कृषीक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या वर्षीचा कृषीभूषण पुरस्कार वाडा तालुक्यातील गालतरे येथील गोवर्धन इको व्हिलेजचे प्रमुख सनतकुमार प्रभुजी यांना देण्यात आला, पण कृषिभूषण पुरस्काराचा खरा हक्कदार सर्वसामान्य शेतकरीच असायला हवा. धर्मादाय संस्थेला कृषिभूषण पुरस्कार देणे संयुक्तिक नाही. तुटपुंज्या साधनांसह व कमी गुंतवणुकीत शेतीमध्ये काबाडकष्ट करून वेगवेगळे प्रयोग करणारा शेतकरीच खरा कृषिभूषण असू शकतो, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटू लागल्या आहेत. राजेंद्र पवार यांनी कृषिरत्न पंजाबराव देशमुख पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यातच आता दुसरा महत्त्वाचा पुरस्कार एका संस्थेला दिल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
---
प्रतिक्रिया
जिल्ह्यातील शेतकऱ्याला सदरचा पुरस्कार द्यायला पाहिजे होता. कृषिमंत्र्यांनी शेतीवर संशोधन करणाऱ्या, शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्याला पुरस्कार द्यायला हवा होता. एका संस्थेला हा पुरस्कार दिल्याने तो आम्हाला मान्य नसून आम्ही त्याचा निषेध करतो.
- बी. बी. ठाकरे, ओबीसी नेते
---
शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या एखाद्या प्रगतशील शेतकऱ्याला पुरस्कार द्यावयास पाहिजे होता. असा पुरस्कार दिल्याने त्याला काही अर्थ राहिला नाही.
- प्रफुल्ल पाटील, युवा शेतकरी
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81016 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..