
‘मॉर्सेलेटर’मुळे थायरॉईडवरील शस्त्रक्रिया आता अधिक सोपी
मुंबई, ता. ३ : भायखळा येथील राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालयाच्या सामान्य शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टरांनी तयार केलेल्या ‘मॉर्सेलेटर’मुळे थायरॉईडवरील शस्त्रक्रिया कमीत कमी छोट्या चिरा घेऊन करणे सहज शक्य होणार आहे. लॅप्रोस्कोपिक (किमान चिरा) शस्त्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणारे ‘मॉर्सेलेटर’ एक वैद्यकीय उपकरण आहे. त्याद्वारे शरीराच्या अवयवाला एकदम छोटी चीर देऊन त्यातून आत जाऊन संबंधित गाठीचे किंवा टिश्यूचे तुकडे केले जाऊ शकतात. ती गाठ किंवा टिश्यू बाहेर काढण्यासाठी वेगळी मोठी चीर करण्याची गरज पडत नाही.
‘आमच्या वैद्यकीय साहित्यातील शोधानुसार, आजपर्यंत थायरॉईड मॉर्सेलेटर वापरल्याचा उल्लेख नाही. आम्ही तयार केलेले उपकरण एकमेव असेल,’ असे जे. जे. रुग्णालयाचे सामान्य शस्त्रक्रियाप्रमुख डॉ. अजय भंडारवार म्हणाले.
थायरॉइडेक्टॉमी म्हणजे मानेसमोर असलेल्या फुलपाखराच्या आकाराच्या थायरॉईड ग्रंथीचा सर्व किंवा काही भाग शस्त्रक्रियेने काढून टाकणे. पारंपरिक शस्त्रक्रियेदरम्यान मानेवर सात सेंटिमीटरपर्यंत चीर केली जाते. लॅप्रोस्कोपिक मार्गाला कमीत कमी तीन चिरा घ्याव्या लागतात. जे. जे. टीमने आपल्या लॅप्रोस्कोपिक थायरॉइडेक्टॉमीसाठी अनेक पुरस्कार पटकावले आहेत. अशी शस्त्रक्रिया करून रुग्णाला बरे करणाऱ्या काही सार्वजनिक रुग्णालयांपैकी जे. जे. एक आहे.
दुर्बिणीने म्हणजेच लॅप्रोस्कोपिक पद्धतीने शस्त्रक्रिया करणे एक आधुनिक पद्धत आहे; पण त्यातही मर्यादा असते ती म्हणजे शस्त्रक्रियेसाठी घेतली जाणारी चीर कमीत कमी असली पाहिजे. दुर्बिणीने शरीरातील अवयव आपण काढतो; पण तो पूर्ण बाहेर काढण्यासाठी आणखी एक मोठी चीर घ्यावी लागते. त्यातून दुर्बिणीचे उद्दिष्ट साध्य होत नाही. ‘मॉर्सेलेटर’ एक असे उपकरण आहे जे आत जाऊन त्या अवयवाला आतच क्रश करून अगदी सहज-सोप्या पद्धतीने आणखी चीर न घेता तो बाहेर काढता येतो, अशी माहिती जे. जे.च्या शस्त्रक्रिया विभागातील डॉ. अमोल वाघ यांनी दिली.
जे. जे.ची टीम लवकरच आपल्या ‘मॉर्सेलेटर’ उपकरणाचे पेटंट घेण्याची योजना आखत आहे. त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. काही प्रमाणात हे आत्मनिर्भर भारताचे उदाहरण म्हणता येईल, असे डॉ. अजय भंडारवार म्हणाले.
सामान्यपणे ‘मॉर्सेलेटर’चा व्यास १५ मिमी असतो. आम्ही तयार केलेला ‘मॉर्सेलेटर’ १० मिमी आहे. थायरॉईड मॉर्सेलेटर बनवण्यासाठी वर्षभर मेहनत घेतली गेली. आम्ही याहीपेक्षा कमी आकाराचा ‘मॉर्सेलटर’ बनवण्याचा प्रयत्न केला; पण त्यात अडचणी आल्या.
- डॉ. अमोल वाघ, जे. जे. शस्त्रक्रिया विभाग
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81017 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..