
मालमत्ता करवसुलीचे ८०० कोटींचे लक्ष्य
वाशी, ता. ३ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेला गतवर्षी मार्चअखेर मालमत्ता कर वसुलीसाठी ढोल वाजवण्यासह इतर कायदेशीर कारवाई करावी लागली होती. त्यामुळे यंदा आतापासूनच करवसुलीचे नियोजन करीत प्रथम थकबाकीदारांकडून वसुली करावी; प्रसंगी कठोर कारवाई करावी, असे आदेश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.
नवी मुंबई पालिकेने २०२१-२२ या आर्थिक वर्षांत मालमत्ता करापोटी ६०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य ठेवले होते. मालमत्ता कर विभागाने वर्षांअखेरीस ५६३ कोटींची वसुली केली. मार्चअखेरच्या चार दिवसांत सुमारे ९२ कोटींची वसुली करण्यात आली. त्यामुळे यंदा सुरुवातीपासूनच करवसुलीचे नियोजन करण्यात येणार आहे.
नवीन आर्थिक वर्षात महापालिका प्रशासनाने ८०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. अखेरच्या टप्प्यात थकबाकीदारांच्या मालमत्तांच्या ठिकाणी जाऊन ढोल वाजवून वसुली करावी लागते. तसेच अनेक ठिकाणी अटकाव करणे, नोटीस बजावणे, खाती सील करणे अशी कठोर पावले उचलावी लागतात. त्यामुळे पहिल्या महिन्यापासूनच वसुलीसाठी हे विविध उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्तांना मालमत्ता विभागाला दिले आहेत.
थकबाकीदारांसाठी वारंवार अभय योजना जाहीर करण्यात आलेली होती; तरीदेखील अनेकांनी थकबाकी भरली नाही. सवलतीचा लाभ घेण्यासही फारशी उत्सुकता दिसून येत नव्हती. या अनुषंगाने मोठ्या रकमेची थकबाकी असलेल्या व विशेष अभय योजनेचा लाभ घेण्यात स्वारस्य न दाखविणाऱ्या थकबाकीदारांवर नव्या आर्थिक वर्षांत थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्यास मालमत्ता जप्तीची, बँक खाती गोठविण्याची तसेच नळजोडणी खंडित करण्याची कारवाई सुरुवातीपासूनच करण्याचे निर्देश दिले आहेत. मालमत्ता कर तसेच इतर कराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातूनच पालिका नवी मुंबई शहरातील विकासकामे करते. त्यामुळे मालमत्ताधारकांनी वेळेतच कर भरणा करणे आवश्यक असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षांत ६०० कोटी मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य ठेवले होते; परंतु मागील आर्थिक वर्षांत ५६२ कोटी वसुली झाली आहे. पुढील आर्थिक वर्षांत ८०० कोटी वसुलीचे लक्ष्य निश्चित केले असून ते १०० टक्के करण्यासाठी अखेरच्या महिन्यात ढोलताशे वाजवून वसुली करण्यापेक्षा आतापासूनच थकबाकी वसुलीचे निर्देश देण्यात आले आहेत.
- अभिजित बांगर, आयुक्त
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81018 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..