अघोषित भारनियमन रोखण्याचे आव्हान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अघोषित भारनियमन रोखण्याचे आव्हान!
अघोषित भारनियमन रोखण्याचे आव्हान!

अघोषित भारनियमन रोखण्याचे आव्हान!

sakal_logo
By

तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : तापमानाचा पारा वाढल्‍याने विजेचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. महावितरणच्या यंत्रणेवर अतिरिक्‍त दाब येत असल्‍याने नवी मुंबईत वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकारही वाढले आहेत. काही भागांत तासन्‌ तास वीज गायब असते. त्‍यामुळे भारनियमन सुरू झाल्‍याचा नागरिकांचा समज झाला आहे. मात्र शहरात सध्या भारनियमन करण्यात येत नसून पावसाळ्यापूर्व कामे, अतिरिक्‍त दाब वाढल्‍याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्‍याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा रोखण्याचे आव्हान सध्या महावितरणसमोर आहे.
नवी मुंबई शहरात दिवसेंदिवस गावठाण, गावठाण विस्तार व झोपडपट्टी व नोडल भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. बांधकामांना विद्युत जोडणी गरजेची आहे; मात्र काही ठिकाणी नियमबाह्य वीजजोडणी घेऊन कामे केली जातात; तर अनेक ठिकाणी वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. अवैध जोडणीचा परिणाम विजेच्या दाबावर होत असून खंडित पुरवठ्याची समस्‍या दिवसेंदिवस वाढत आहे.
एप्रिल महिन्यापासूनच सूर्यनारायण आग ओकू लागला आहे. त्‍यामुळे घराघरांत, कार्यालयांत, हॉटेल, रेस्‍टॉरंटमध्ये पंखे व वातानुकूलित यंत्रणा मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. वीजवाहिन्यांवर अतिरिक्‍त ताण येत असल्‍याने प्रवाह कमी-जास्‍त होत असून विद्युत यंत्रणांमध्ये बिघाड होण्याचे प्रकार वाढले आहेत. गावठाण, गावठाण विस्तार व झोपडपट्टी परिसरात तर चार-चार तास वीज गायब होत असल्‍याने नागरिकांमधून संताप व्यक्‍त होत आहे.

वीस ते पंचवीस टक्के विजेचा शोध नाही?
सध्या शहरात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे सुरू आहेत. या ठिकाणी कुणाचीही परवानगी न घेता वीज वापरली जाते. बांधकामे पूर्ण झाल्‍यावर सदनिकांमध्ये वीजजोडणी घेतली जाते. यामुळे साधारणपणे २० ते २५ टक्के विजेचा शोध लागत नसल्याचे माहिती महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गेल्‍या महिन्यात महावितरणकडून कारवाई करून कोट्यवधींची वसुली करण्यात आली होती; मात्र अशा प्रकारची कारवाई सातत्‍याने होणे गरजेचे असल्‍याचे सुज्ञ नागरिकांकडून बोलले जात आहे.

उष्‍मा वाढल्‍याने विद्युत उपकरणांचा जास्‍त वापर केला जात आहे. त्याचा भार यंत्रणेवर पडत आहे. त्यामुळे वीजवाहिन्या, रोहित्रांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याचे प्रकार वाढले आहेत. सध्या शहरात भारनियमन नाही; मात्र नागरिकांनीही विजेची बचत करणे गरजेचे आहे.
- ममता पांडे, जनसंपर्क अधिकारी, भांडुप मंडळ, महावितरण

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81019 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top