
सराफा बाजाराला सोनेरी झळाली
ठाणे, ता. ३ (बातमीदार) : कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या सावटानंतर मंगळवारी, ३ मे रोजी अक्षय्यतृतीयेचा सण सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व असल्यामुळे सोन्याच्या भावाने उच्चांक गाठलेला असतानाही ठाण्यातील सराफा बाजारात मंगळवारी सोनेखरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली.
मागील काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावाने उच्चांकी दर गाठल्याने ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे ठाण्यातील सराफा बाजारातही मंदीसदृश वातवरण होते. तेव्हा अक्षय्यतृतीयेलाही ग्राहकांचा सोने खरेदीसाठी अधिक प्रतिसाद मिळणार, असा व्यापाऱ्यांना अंदाज होती; मात्र हौसेला मोल नसते, या म्हणीप्रमाणेच सोन्याचे भाव अधिक असूनही अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधून ठाण्यातील सराफा बाजारातून नागरिकांनी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केल्याचे पाहायला मिळाले.
अक्षय्यतृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव प्रतितोळा ५१ हजार ५०० इतका होता; तर चांदीचा भावही प्रतिकिलो ६६ हजार इतका होता. कोरोना साथीत गेलेल्या २ वर्षांच्या काळानंतर प्रथमच अक्षय्यतृतीयेचा सण उत्साहात साजरा करता आल्याने ग्राहकांनी सोने खरेदीत हात आखडता न घेतल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मे, जून महिन्यात लग्नसोहळे असणाऱ्या ग्राहकांनी दागिन्यांची अधिक खरेदी केल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तसेच मुहूर्तावर सोने खरेदी करण्याऱ्या ग्राहकांनी ५ ग्रॅम सोन्याचा मणी, लाईट वेट दागिने, चांदीच्या वस्तू आदींची खरेदी केली.
सोन्या-चांदीचे भाव मागील काही दिवसांपासून अधिक असल्याने ग्राहक सोने खरेदीसाठी वळत नव्हते; परंतु दोन वर्षांनंतर अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधत सोने खरेदी करता आल्याने दिवसभर सराफा बाजारात ग्राहकांची लगबग होती.
- कमलेश श्री श्री माला, सराफा व्यापारी असोसिएशन, ठाणे
अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त हा सोने खरेदीसाठी खूप खास आहे. दर वर्षी यानिमित्ताने थोडी का होईना, सोने खरेदी करतो. मागील दोन वर्षी टाळेबंदीमुळे खरेदी करता आली नाही; मात्र यंदा सोन्याचे कानातले दागिने खरेदी केले आहेत.
- आकांक्षा भुवड, ग्राहक
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81020 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..