
हुक्का पार्लर चालकासह २६ जण ताब्यात
नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : वाशी सेक्टर-३१ मधील हाऊस ऑफ लॉर्डस या लाऊंज बारमध्ये बेकायदा सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर सीबीडी पोलिसांनी शनिवार रोजी (ता. ३०) छापा टाकला. या वेळी बारमध्ये हुक्का ओढण्यासाठी बसलेले १७ ग्राहक, रेस्टॉरंटमधील मॅनेजर व इतर नऊ जण अशा एकूण २६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व तंबाखुजन्य पदार्थ जप्त करून सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वाशी सेक्टर- ३१ मधील हाऊस ऑफ लॉर्ड या लाऊंज बारमध्ये बेकायदा हुक्का पार्लर चालवण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यावर या लाऊंज बारवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार सीबीडी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (गुन्हे) उमेश गवळी व त्यांच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास बारवर छापा मारला. या वेळी १७ ग्राहक हुक्का ओढत बसल्याचे तसेच त्या ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थांचा धुरकट वास व धूर पसरल्याचे आढळून आले. पोलिसांनी बारचा मॅनेजर निजामउद्दीन आरिफ (३३), वेटर केवल भल्ला (३९), कुणाल कमेद (२६), रोहित जाधव (३२), जयचंद मगी (४०), अमित कुमार (३९), अरविंद जाधव (३४), आशिष विश्वास (२४), शांतनू पाल (२१) यांना ताब्यात घेतले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81029 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..