
महिन्याभरात एसटीची ३०० कोटींची कमाई
मुंबई, ता. ३ ः पाच महिन्यांच्या संपानंतर राज्यातील एसटी सेवा पूर्वपदावर आली आहे. कर्तव्यावर रूजू झालेले कर्मचारी आणि उपलब्ध बसगाड्यांच्या माध्यमातून एसटीने गेल्या महिनाभरात तब्बल २९६ कोटी ५९ लाखांची कमाई केली. दरम्यान, राज्यात दररोज सरासरी २२ ते २४ लाख प्रवासी एसटीने प्रवास करत असून दैनंदिन सरासरी १३ ते १४ कोटींचे उत्पन्न एसटीला मिळत आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २२ एप्रिलपासून राज्यभरातील संपकरी एसटी कर्मचारी कर्तव्यावर परतले. पाच महिन्यांच्या संपामुळे अनेक बसगाड्या नादुरुस्त असल्याने सध्या रस्त्यावर धावणाऱ्या एसटींची संख्या कमी आहे. तरीही उपलब्ध बसगाड्यांच्या संख्येत एसटीने अधिकाधिक फेऱ्या करण्याचे नियोजन आखले आहे. त्यानुसार एप्रिल महिन्यात एसटीने २९६ कोटी ५९ लाखांचे उत्पन्न मिळवले. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांत राज्यभरातील सर्वसामान्यांची एसटीशी तुटलेली नाळ पुन्हा एकदा जुळत असल्याचे दिसत आहे.
४ ते १२ एप्रिलदरम्यान सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या १२ लाखांच्या घरात होती. प्रवासी संख्येत हळूहळू वाढ होत ती एप्रिलअखेरपर्यंत तब्बल २३ लाखांच्या घरात पोहचली आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
----
एसटीचे वाढते उत्पन्न
दिनांक - एसटीची संख्या - उत्पन्न - प्रवासी संख्या
२५ एप्रिल - ११९५६ - १४ कोटी २७ लाख - २३ लाख ९६ हजार
२६ एप्रिल - १२१२५ - १३ कोटी ६६ लाख- २३ लाख ६३ हजार
२७ एप्रिल - १२२०४ - १२ कोटी ९७ लाख - २२ लाख ७० हजार
२८ एप्रिल - १२३२३ - १२ कोटी ४८ लाख - २२ लाख ६८ हजार
२९ एप्रिल - १२४७८ - १२ कोटी ६० लाख - २२ लाख ८३ हजार
३० एप्रिल - १२५८६ -१३ कोटी २५ लाख - २२ लाख ६० हजार
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81033 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..