
चर्चगेट ते गेटवे परिसराचा होणार मेकओव्हर
मुंबई, ता. ३ ः महापालिकेच्या रस्ते विभागाच्या माध्यमातून दक्षिण मुंबईतील पदपथ, बसथांबे आणि पाणपोईंचा
मेकओव्हर करण्यात येणार आहे. चर्चगेट रेल्वेस्थानक आणि डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक पुरातन वास्तू परिसर आहेत. गेल्या काही वर्षांत डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक परिसरातील काही भागांचे सुशोभीकरण महापालिकेच्या प्रमुख अभियंता (इमारत परीरक्षण) खात्याच्या माध्यमातून करण्यात आले होते.
दक्षिण मुंबईतील चर्चगेट रेल्वेस्थानक परिसर आणि डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक परिसराच्या सुशोभीकरणासाठी रस्ते व पदपथ विकास आणि मेट्रो चित्रपटगृहालगतच्या माधवदास लक्ष्मणदास कोठारी प्याऊचा जीर्णोद्धार आदी कामांचे भूमिपूजन राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक परिसरातील सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराचे पदपथ आणि चर्चगेट स्थानक परिसरातील सुमारे दीड किलोमीटर अंतराच्या पदपथ विकासासह सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पदपथासह बसथांबे आणि रंगरंगोटीसह इतर बाबींचाही समावेश आहे. ती कामे डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पूर्वी मुंबई शहरात वाटसरूंची आणि प्राण्यांची तहान भागवण्यासाठी विविध ठिकाणी पाणपोई अर्थात प्याऊंची निर्मिती करण्यात आली होती. त्यांचे संचालन धर्मादाय संस्था अथवा दात्यांकडून केले जात असे.
पुरातन ‘प्याऊं’चाही होणार जीर्णोद्धार
मेट्रो चित्रपटगृहालगत पुरातन वास्तू श्रेणीत मोडणारी माधवदास लक्ष्मणदास कोठारी प्याऊ आहे. मंदिरांच्या शिखराप्रमाणे दोन नक्षीदार कमान असलेल्या माधवदास लक्ष्मणदास कोठारी प्याऊचा शास्त्रोक्त पद्धतीने जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. प्याऊची मूळ नक्षीदार संरचना पूर्ववत करणे, तुटलेले पुरातन भाग त्याच प्रकारच्या दगडांपासून तयार करून पुनर्स्थापित करणे, ओतीव लोखंडांचे नक्षीदार नळ बसवणे, जलव्यवस्था पूर्ववत करून टाकीमधून शुद्ध पाणी उपलब्ध होण्याची व्यवस्था करणे आदी निरनिराळी कामे जीर्णोद्धाराअंतर्गत होणार आहेत. जीर्णोद्धाराचे काम नऊ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासोबत तीन वर्षे परीरक्षणाचे कामही सोपवण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81042 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..