
मशिदीसमोर हनुमान चालिसा नको
टिळकांना वादात ओढू नये!
मराठा महासंघाची भूमिका; भोंग्यांबाबतही मांडले मत
मुंबई, ता. ३ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या वादात लोकमान्य टिळकांसारख्या महापुरुषाला ओढण्याचे घाणेरडे राजकारण कोणी करू नये, तसेच मशिदीसमोर हनुमान चालिसाचे वाचनही करू नये, अशी भूमिका अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांनी मांडली.
अक्षय्य तृतीयेनिमित्त महासंघाच्या आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. समाजात दुही निर्माण करणारी कोणतीही वक्तव्ये मराठा महासंघाच्या विचारसरणीला मान्य नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची बांधणी महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी मिळून केली आहे. त्याबाबतचे पुरावेसुद्धा इतिहास संशोधकांकडे आहेत. त्यामुळे त्या वादात लोकमान्य टिळकांसारख्या महापुरुषाला ओढून राजकारण करणे हे योग्य नाही असेही पवार म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मांतील नागरिकांना एकत्र करून स्वराज्याची संकल्पना मांडली व सुराज्य निर्माण केले. त्याच विचारावर सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन काम करण्यात सर्वांचे हित आहे. मुळात इतिहासात महान कार्य केलेल्या व्यक्तींवरून आता असे वाद घालून आज गरिबांच्या भुकेचा व रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही. किंबहुना, तसे केल्याने जातीय विद्वेष वाढण्याखेरीज काहीच होणार नाही. ही छत्रपती शिवरायांची शिकवण नाही, हे सर्वांनी ध्यानात ठेवावे, असेही ते म्हणाले.
----
ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न चर्चेने सोडवावा
हनुमान चालिसा सर्वांनी मंदिरात किंवा स्वतःच्या घरात वाचावी. मशिदीत नमाज पठण केले जाते तिथे हनुमान चालिसा वाचण्याचे कारण नाही. ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न चर्चेने किंवा कायदेशीर मार्गाने सोडवावा, असे आवाहनही पवार यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81045 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..