
सुटका करवून देशकार्य सुरु ठेवण्याचे सावरकरांचे धोरण ः अक्षय जोग
वसई, ता. ३ (बातमीदार) ः माझ्या देहाचा, बुद्धीचा देशाला काय उपयोग होईल याचा सदैव विचार करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा ब्रिटिशांकडे क्षमा मागून सुटका करून घेणे आणि त्याचा उपयोग देशकार्य, समाजकार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी करणे हे सावरकरांचे धोरण होते. त्यामुळे देशाविषयी त्यांचे असलेले प्रेम, धडपड लक्षात येते, असे प्रतिपादन अक्षय जोग यांनी केले. संजीवनी व्याख्यानमालेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर- आक्षेप व वास्तव’ या विषयावर ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी प्रभाकर नाईक यांच्यासह चिराग पाटील, कौस्तुभ पाटील, ध्रुव पाटील, विष्णू पाटील, नेहा पाटील, अरविंद पाटील, अनंत नाईक, संजीवनी परिवाराचे कमळाकर पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अक्षय जोग पुढे म्हणाले, की सावरकरांच्या हिंदुत्वावर वेगवेगळे आक्षेप आहेत; मात्र देशाची उभारणी धर्मावर नव्हे तर विज्ञाननिष्ठा व बुद्धिनिष्ठतेवर व्हावी अशा मताचे सावरकर होते. सर्वसमावेशक अशी व्याख्या सावरकरांनी केली. त्यांचे विचार प्रेरित करणारे आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात सावरकरांच्या ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे’ या स्वतंत्रदेवतेच्या आराधनेने तर सांगता ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ या गीताने करण्यात आली. व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन कनिष्का नाईक हिने केले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81060 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..