
‘स्ट्रोक्स ऑफ हार्मनी’त संगीत, कला आणि साहित्याचा संगम
मुंबादेवी, ता. ४ (बातमीदार) : कला आणि संगीत या दोन घटकांमध्ये भावनांना प्रभावित करण्याची ताकद आहे. उषा मंगेशकर यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने संगीत, कला आणि साहित्य यांचा संगम आपल्याला पाहायला मिळणार आहे. उषा मंगेशकर यांच्या चित्रांमध्ये एकाच वेळी स्वतःला शोधण्याची आणि हरवण्याची ताकद आहे, असे उद्गार लेखक रिदम वाघोलीकर यांनी काढले. ‘स्ट्रोक्स ऑफ हार्मनी’ पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते.
लतिका क्रिएशन्सतर्फे प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर आणि ख्यातनाम मंगेशकर कुटुंबीयांनी रेखाटलेल्या चित्रांचे संकलन असलेल्या ‘स्ट्रोक्स ऑफ हार्मनी’ या पुस्तकाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार वासुदेव कामत यांच्या हस्ते करण्यात आले. मंगळवारी (ता. ३) दिवंगत पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या मुंबई येथील ‘प्रभुकुंज’ या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. या वेळी लेखक रिदम वाघोलीकर, रचना शहा, डॉ. निशित शहा, योगेश खडीकर, आदिनाथ मंगेशकर, सुधीर आणि अनुराधा वाघोलीकर, प्रशांत आणि सविता दंडवते, आशय वाघोलीकर, डॉ. किरण गुप्ता आदी उपस्थित होते.
या पुस्तकाची निर्मिती २७ वर्षीय अनुजा रिदम वाघोलीकर यांनी केली आहे आणि नूतन आसगावकर यांनी सुंदर डिझाईन केले आहे. पुस्तकाची प्रस्तावना रचना शाह यांनी लिहिली आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मंगेशकर कुटुंबातील तीनही पिढ्या उपस्थित होत्या. उषा मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, अनुजा भोसले, सांजली खडीकर, झनई भोसले, रंजय भोसले आणि लता दीदींचे दोन मास्टरस्ट्रोक असलेले हे पुस्तक नक्कीच संग्रह करण्यायोग्य आहे. या कॉफी टेबल बुकमध्ये एकूण १२९ चित्रे आहेत. उषा मंगेशकर यांनी विविध पेंटिंग तंत्रांचा वापर करून यातील चित्रे साकारली आहेत.
...
या पुस्तकाच्या माध्यमातून मी चित्रकार या रूपाने सर्वांना भेटत आहे. चित्रकला ही माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ असलेली गोष्ट आहे. कोणत्याही कलाप्रकारात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्या कलेचा सखोल अभ्यास आवश्यक असतो. या पुस्तकात तुम्हाला दिसणारी चित्रे ही या कला प्रकाराबद्दलच्या माझ्या समजाचा शिखर बिंदू आहे. ही चित्रे म्हणजे परिपूर्ण कला नाही, कारण कोणत्याही कलेला कधीही पूर्णविराम लावता येत नाही.
- उषा मंगेशकर
...
लता मंगेशकर यांना समर्पित...
पुस्तकाच्या निर्मात्या आणि प्रस्तुतकर्ता अनुजा वाघोलीकर म्हणाल्या, उषाताईंच्या चित्रांमधील प्रत्येक स्ट्रोक कलाकुसर, अभिजातता, समर्पण, परिपूर्णता दर्शवते. ही चित्रे तुमच्याशी एक अनोखा संवाद साधतात. हे पुस्तक आम्ही आमच्या माँ सरस्वती आणि कोट्यवधी मनांवर राज्य करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांना समर्पित करत आहोत.
...
चित्रांसाठी माध्यमांचा वापर
जलरंग ३५
तैलरंग १६
पेन्सिल स्केचेस २८
ऑईल पेस्टल्स १३
...
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81069 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..