
ठाण्यात नो कॅश काऊंटर
ठाणे, ता. ४ : मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय मंगळवारी (ता. ३) ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्यात आले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या रुग्णालयासह टीबी मुक्त ॲप व हायराईझ फायर फायटिंग व्हेईकलचे लोकार्पण करण्यात आले. मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय हे नो कॅश काऊंटर आहे. तसेच सुपर स्पेशालिटी उपचार व शस्त्रक्रियेच्या अद्ययावत सुविधांनी युक्त असे हे रुग्णालय आहे.
वागळे, श्रीनगर परिसरातील नागरिकांना या रुग्णालयाच्या माध्यमातून अद्ययावत सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्लॅटिनम रुग्णालयाच्या सहकार्याने या ठिकाणी १०० खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या रुग्णालयात सुपर स्पेशालिटी उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यामध्ये हृदयविकारासंबंधी तपासणी व उपचार, युरोलॉजी व इतर वैद्यकीय सेवांचा समावेश आहे. या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ‘नो कॅश काऊंटर’ पद्धतीनुसार रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. तसेच शस्त्रक्रिया करण्याअगोदरची ओ.पी.डी. सेवा आणि वैद्यकीय चाचण्यादेखील विनामूल्य करण्यात येणार आहेत. ठाणे पालिकेच्या आरोग्य विभागास आयसीआयसीआय बँकेने सीएसआर फंडातून एक पिडीयाट्रिक व एक ॲडल्ट कार्डिॲक रुग्ण्वाहिका उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णवाहिकांचे लोकार्पणदेखील आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
टीबीमुक्त ॲप तयार करणारी पहिली पालिका
क्षय रुग्णांसाठी ठाणे पालिकेच्या माध्यमातून टीबीमुक्त ॲप तयार करण्यात आले असून हे ॲप तयार करणारी ठाणे ही राज्यातील पहिली महापालिका आहे. या ॲपच्या माध्यमातून प्रयोगशाळेतून टीबी चाचणीचा अहवाल तयार झाल्यावर त्वरित रुग्णाच्या मोबाईलवर त्याच दिवशी एसएमएसद्वारे उपलब्ध होणार आहे. तसेच रुग्णांचा चाचणी अहवाल, औषधोपचाराची माहिती, जवळच्या क्षयरोग मोफत उपचार केंद्रांची माहिती उपलब्ध होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81073 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..