
‘गरिबी, उपासमारी हटवण्यास ७० वर्षांत कोणी अडवले?’
मुंबई : हनुमान चालिसा वाचून गरिबीचा व उपासमारीचा प्रश्न सुटणार नाही, अशी टीका करणाऱ्यांना देशातील गरिबीचा व उपासमारीचा प्रश्न सोडविण्यापासून गेल्या ७० वर्षांत कोणी अडवले होते, असा प्रश्न मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष शीतल गंभीर-देसाई यांनी विचारला आहे. या विषयावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेला देसाई यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले आहे. अशी टीका करणाऱ्यांचे पूर्वसुरी गेली सत्तर वर्षे केंद्रात व राज्यात सत्तेवर होते. सन २०१४ पूर्वी पंधरा वर्षे महाराष्ट्रात याच पक्षांचे सरकार सत्तारूढ होते, मात्र त्यांनी गरिबांचे प्रश्न सोडविण्यावर अजिबात लक्ष दिले नाही. त्याचमुळे आजदेखील ही मंडळी उपासमारीचा प्रश्न सुटेल का, असे धाय मोकळून रडत आहेत, असा टोलाही श्रीमती देसाई यांनी लगावला आहे.
उपासमारीच्या प्रश्नावर गळे काढणाऱ्या पक्षांचे मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ज्या वेगाने तुरुंगात जात आहेत व सुपात असलेल्या उरलेल्यांवर जे आरोप होत आहेत ते पाहता या मंडळींचे गेल्या सत्तर वर्षांतील प्राधान्यक्रम काय होते, हे सहज कळून येते. केवळ आपली मतपेढी जपण्यासाठी ही मंडळी अशी वक्तव्ये करीत आहेत. मात्र त्यांना कोणत्याही समाजघटकाबाबत कसलेही प्रेम नाही, असलेच तर ते पूतनामावशीचे प्रेम आहे, अशीही टीका देसाई यांनी केली.
सर्व समाजघटकांचे हित पाहणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केवळ विशिष्ट घटकांचे लांगूलचालन न करता सर्वच समाजाला भेडसावणारे प्रश्न सोडवावेत.
- शीतल गंभीर-देसाई, अध्यक्ष, मुंबई भाजप महिला मोर्चा
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81086 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..