नवी मुंबई डेब्रिज माफियांना आंदण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबई डेब्रिज माफियांना आंदण!
नवी मुंबई डेब्रिज माफियांना आंदण!

नवी मुंबई डेब्रिज माफियांना आंदण!

sakal_logo
By

वाशी, ता. ४ (बातमीदार) ः एमआयडीसी परिसरात डेब्रिज माफियांनी धुमाकूळ घातला आहे. शेकडो डंपरमधून डेब्रिज एमआयडीसीच्या भूखंडावर खाली केले जात आहे. एमआयडीसीच्या ऐरोली येथील पार्किंगच्या भूखंडावर डेब्रिजचे डोंगर निर्माण झाले आहेत. ठाणे व मुंबईतील बांधकामाचा कचराही एमआयडीसीमध्ये टाकला जात आहे. नागरिकांकडून याबाबत तक्रारी करण्यात आल्‍या असल्‍या तरी अद्याप हे प्रकार थांबलेले नाहीत.
रबाळे, महापे येथील भूखंडावरही डेब्रिजमाफीयांनी कब्‍जा केला आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये डेब्रिजची अनधिकृत डम्‍पिंग ग्राउंड तयार होऊ लागले आहेत. अडवली- भुतावलीमध्ये हजारो डंपरमधून डेब्रिजचा भराव करण्यात आला होता. त्यामुळे काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर तेथील अतिक्रमण काही प्रमाणात थांबले आहे. त्यामुळे डेब्रिजमाफियांनी इतर परिसरामध्ये नवीन डंपिंग ग्राउंड तयार केले आहे.
इंदिरानगरमधील शांताबाई जामा सुतार उद्यान व हिरादेवी मंदिर परिसरामधील नैसर्गिक नाल्यात मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडासह, पार्किंगच्या राखीव भूखंडावर, एमआयडीसी जलवाहिनीलगत, मुख्य रस्त्यालगत शेकडो डंपरमधून डेब्रिज टाकले जात असून महापालिका व एमआयडीसी प्रशासन या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.
शहरात नागरिकांनी घरदुरुस्ती करून निघालेला प्लास्टरचा कचरा मोकळ्या जागेवर टाकण्याचा प्रयत्न केल्यास महापालिकेचे भरारी पथक तत्काळ कारवाई करते. परंतु शेकडो डंपर खाली करणाऱ्या डेब्रिजमाफियांना मात्र अभय दिले जात आहे. एमआयडीसीमध्ये जागा मिळेल त्या ठिकाणी भराव सुरू असून भविष्यात त्याचे गंभीर परिणाम शहरवासीयांना सहन करावे लागणार आहेत. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे डेब्रिज एमआयडीसी परिसरात टाकले जात असल्‍याचे बोलले जात आहे.

कचऱ्यामुळे रोगराईची शक्‍यता
डेब्रिजमुळे डासांचा प्रार्दुभाव वाढला असून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. डेब्रिजमुळे पाण्याचा निचरा होत नसल्‍याने पावसाळ्यात जागोजागी पाणी साचते. डेब्रिज टाकल्याने सुस्थितीतील भूखंडाची अवस्था दयनीय होत आहे. यासंदर्भात पालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त अमरीश पटनीगिरी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

एमआयडीसीच्या भूखंडावर डेब्रिज टाकण्यात येत असले तरी महापालिकेच्या डेब्रिज भरारी पथकाने कारवाई करायची आहे.
- एस.एम.गित्ते, उपअभियंता, एमआयडीसी

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81087 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top