
भाताच्या कोठारात सूर्य खरबुजाची लागवड
वाडा, ता. ४ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका म्हणजे ‘भाताचे कोठार’ म्हणून प्रसिद्ध आहे. पण याच वाडा तालुक्यातील सांगे गावातील प्रयोगशील तरुण शेतकरी गौतम पाटील यांनी आपल्या शेतात सूर्य खरबुजाची यशस्वी लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले आहे. गौतम हे आपल्या शेतात विविध प्रयोग करत असतात. त्यांनी यापूर्वी केळी, चिकू, पपई, केसर आंबा आदींचीही लागवड करून चांगले उत्पादन मिळवले आहे.
तरुण शेतकरी गौतम पाटील यांनी वडील कृषिभूषण अनिल पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत आधुनिक पद्धतीने फळबाग लागवड सुरू केली आहे; परंतु त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी बाहेरून पिवळ्या दिसणाऱ्या कलिंगडाची लागवड केली. त्यानंतर आतून पिवळे असणाऱ्या कलिंगडाचीही लागवड त्यांनी केली. गेल्या ५ वर्षांपासून कलिंगडानंतर चांगले येणारे पीक म्हणून सूर्य खरबुजाची लागवड केली आणि हा प्रयोग यशस्वी झाल्याचे ते सांगतात. हे पीक कोकणात उन्हाळ्यात खूप छान होते. विशेष म्हणजे बदलत्या हवामानात व रणरणत्या उन्हात सदर पीक चांगले तग धरते, असेही ते म्हणाले.
गौतम यांनी प्रायोगिक तत्त्वावर अर्धा एकरात सूर्य खरबुजाची लागवड केली आहे. ‘नोनोयू’ या कंपनीचे हे वाण आहे. या फळाला बिग बास्केटमध्ये मागणी आहे. हे पीक ६० ते ७० दिवसांत तयार होते. या वर्षी फक्त अर्धा एकरावर त्याची लागवड केली असून सुमारे ५ ते ६ टन उत्पन्न मिळू शकेल. एक फळ साधारणपणे ८०० ग्रॅम ते दीड किलोपर्यंत असते.
सूर्य खरबुजाचे गुणधर्म
-अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळते.
- शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.
- वजन कमी करण्यास उपयुक्त.
- गोडपणा कमी असल्याने मधुमेहाचा त्रास असणारेही खाऊ शकतात.
कामात सतत सुधारणा व नवीन तंत्रज्ञान वापरून शेती अधिक सोपी करण्याचा प्रयत्न करत आहोत. पिकांच्या सततच्या बदलत्या परिस्थितीत सुधारणा करणे आवश्यक असते. ती बाब आम्ही करत असतो.
- गौतम पाटील, प्रयोगशील शेतकरी, सांगे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81088 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..