
महापे शिळफाटा रस्त्यावर अंधाराचे सांम्राज्य
वाशी, ता. ४ (बातमीदार) ः शिळफाटा ते महापेपर्यंतच्या रस्त्यावर पथदिवे बसवण्यात आले नाहीत. त्यामुळे नवी मुंबई औद्योगिक श्रेत्रामधून जाणाऱ्या या सहा किलोमीटर रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अंधाराचा फायदा घेऊन चोर-लुटारू नागरिकांना लुटत असल्याचे प्रकार या ठिकाणी अनेकदा घडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर जाताना नागरिकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे.
महापे-शिळफाटा येथील रस्त्याचे काम एमएमआरडीएकडून करण्यात आले आहे. हा रस्ता नवी मुंबई व शिळफाट्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यामुळे कल्याण, डोबिवली, अंबरनाथ, बदलापूरला जाणे सोईस्कर झाले आहे; मात्र या रस्त्याचे काम होऊनदेखील येथे पथदिवेच बसवण्यात आले नाहीत. या रस्त्य्यावर दोन उड्डाणपूल असून त्या ठिकाणी पथदिवे बसवण्यात आले आहेत; मात्र उड्डाणपुलाव्यतिरिक्त असणाऱ्या रस्त्यावर पथदिवेच नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. एमएमआरडीएकडून हा रस्ता एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यानंतर एमआयडीसीकडून पालिकेला हा रस्ता देखभालीसाठी हस्तांतरित करण्यात येणार येणार आहे, पण या मार्गावर पथदिवे बसवल्यांनतर यांचे विद्युत देयक कोणी भरायचे या वादावरून पथदिवेच बसवण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात पालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81091 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..