
भारनियमनाविषयी खुलासा करण्याची मागणी
बेलापूर, ता. ४ (बातमीदार) ः नेरूळ नोडमध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. हा वीज वाहिन्यांचा दोष आहे की भारनियमन सुरू करण्यात आले आहे, याबाबत खुलासा करण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांकडे त्यांनी लेखी निवेदन दिले आहे. भारनियमन सुरू केले असल्यास त्याचे वेळापत्रक जाहीर करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक युनिटमागे ४३ ते ४७ पैसे कमी करणे आवश्यक आहे, अशी मागणीही भगत यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नेरूळ पश्चिम परिसरात अनेकदा वीज कपात केली जात आहे. त्यामुळे महावितरणने भारनियमन सुरू केले असल्याचे स्थानिक रहिवाशांमध्ये बोलले जात आहे. पण महावितरणकडून हे जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे भारनियमन सुरू केले असेल तर नेरूळ पश्चिमेला कोणत्या विभागात, कोणत्या सेक्टरमध्ये, कोणत्या वेळेला व किती वेळ वीज नसणार याचे वेळापत्रक प्रकाशित करणे आवश्यक आहे, अशी मागणी गणेश भगत यांनी निवेदनातून केली आहे. तसेच, नवी मुंबई शहर भारनियमनमुक्त असावे म्हणून महावितरणने काही वर्षांपूर्वी अंदाजे ४३ ते ४७ पैसे प्रत्येक युनिटमागे आकारण्यास सुरुवात केली होती. भारनियमनाची समस्या त्यावेळी नष्ट झाली असली तरी अतिरिक्त आकारले जाणारे पैसे मात्र महावितरणने ग्राहकांना परत केले नाहीत. त्यामुळे आता भारनियमन सुरू केल्यास प्रत्येक युनिटमागे ग्राहकांना अंदाजे ४३ ते ४७ पैसे कमी करणे आवश्यक आहे, अशी मागणी भगत यांनी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81092 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..