
दोन वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचे गुढ उलगडले
नवी मुंबई : दोन वर्षांपूर्वी खालापूर येथे सापडलेल्या पुरुषाच्या मृतदेहाचे गूढ आता उलगडले आहे. त्या व्यक्तीचे नाव सावकार घुले (४८) असून त्याची हत्या त्याच्या पत्नीनेच केल्याचे तपासात उघड झाले आहे. मालमत्ता हडप करण्यासाठी ही हत्या घडवून आणल्याचे समोर आले आहे. कोपरखैरणे पोलसांनी पल्लवी व हत्येत साथ देणारा तिचा प्रियकर गणेश दरेकर या दोघांना अटक केली आहे. त्यांना खालापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत खालापूर येथे मृतदेह आढळून आला होता. मृत सावकार घुले यांची पहिली पत्नी वारल्यानंतर आपला भाचा गणेश दरेकर याच्या सांगण्यावरून त्यांनी पल्लवी हिच्याशी २०२० मध्ये दुसरे लग्न केले होते, पण पल्लवी व गणेश यांचे आधीपासूनच प्रेमसंबंध होते. घुले यांची जमीन हडपण्यासाठीच या दोघांनी लग्न करण्याचा बनाव रचल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. पल्लवीच्या सांगण्यावरून घुले त्यांच्या गावाकडील जमीन विकण्यास तयार झाले होते, पण गणेश व पल्लवी यांच्या संबंधांविषयी माहिती झाल्याने त्यांनी व्यवहार अर्थवट ठेवला व ते गावी निघून गेले.
त्यानंतर गणेश व पल्लवी घुले यांना त्यांच्या गावाहून कोपरखैरणे येथे आणण्यासाठी गेले. वाटेतच त्यांना झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या आणि खालापूरजवळ त्यांना चालत्या रिक्षातून फेकून देऊन पलायन केले. त्यानंतर घुले यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचा बनाव करण्यात आला, पण घुले यांच्या वडील आणि भावाने मृत्यूवर शंका घेऊन पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी पल्लवी हिची चौकशी केली असता वरील प्रकार उघडकीस आला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81097 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..