
एचआयव्ही बाधित मुलांसाठी ‘मितवा’ची साथ
मुंबई : विरारला राहणारी २० वर्षीय विनिशा कांबळी (नाव बदललेले आहे) हिला ती १७ वर्षांची असताना एचआयव्हीबाधित असल्याची जाणीव झाली. शारीरिक कष्टामुळे एचआयव्हीचा संसर्ग पसरू नये म्हणून दिलेली औषधे-गोळ्या घेणे तिने जवळपास सात ते आठ महिने बंद केले. परिणामी, तिची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली होती, पण २०२० मध्ये सुरू झालेल्या ‘मितवा’ उपक्रमात ती दाखल झाली आणि तिचे जीवन बदलले... एचआयव्ही संसर्गाची बाधा झालेल्या मुलांसाठी पालिकेतर्फे राबवण्यात येत असलेल्या ‘मितवा’ उपक्रमाला दोन वर्षे कोविड महामारीमुळे फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता; मात्र आजपासून सुरू झालेल्या तीनदिवसीय ‘मितवा’ सत्राला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशीच जवळपास ३० मुला-मुलींना सुदृढ आहाराविषयी माहिती देण्यात आली.
९०० किशोरवयीन मुले एचआयव्हीने ग्रस्त
मुंबई-ठाण्यात १३ ते १९ वयोगटातील विनिशासारखी एकूण ९०० एचआयव्हीबाधित किशोरवयीन मुले-मुली आहेत. त्यापैकी ४८१ मुले आहेत; तर ४१९ मुली. सर्वांची एआरटी केंद्रांवर नोंद असून त्यांचे उपचार त्याअंतर्गत सुरू आहेत. सर्व मुलांना मातेपासून एचआयव्हीचा संसर्ग झाला असून त्यांना त्याबाबतची माहिती एका ठराविक वयात मिळणे फार गरजेचे असते. त्यासाठी पालिकेने ‘मितवा’ उपक्रम २०२० पासून सुरू केला. आता कोविड बऱ्यापैकी कमी झाल्याने मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी (एमडॅक्स) ‘मितवा’ समुपदेशन सत्र राबवत आहे. ४ ते ६ मे असे तीन दिवस ते आयोजित करण्यात आले आहे आणि त्यास प्रतिसादही चांगला मिळत आहे. सत्राअंतर्गत एचआयव्हीबाधित मुलांना सुदृढ आहाराविषयी माहिती देण्यात येत आहे.
आहारापासून लैंगिक सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन
तीन दिवसीय समुपदेशन सत्रात एचआयव्हीबाधित मुला-मुलींना चांगल्या आहारापासून लैंगिक सुरक्षा आणि सुरक्षित संबंधांबाबत माहिती दिली जाते. एआरटीवरील दिल्या जाणाऱ्या गोळ्या आणि औषधे नेमकी कशासाठी? याची माहिती देऊन संबंधित मुलाला त्याला एचआयव्हीचा संसर्ग असल्याचे समजावून सांगण्यासाठी कार्यशाळा महत्त्वाची भूमिका पार पाडते. एचआयव्ही रोगाविषयी कोणालाही काहीही न सांगता कसे जगायचे किंवा त्याबाबत कुणाला सांगायचे आणि समाजातील गैरसमज कसे हाताळायचे आदी प्रश्नांची उत्तरे मुलांना दिली जातात. बालपणीच त्यांना एचआयव्हीची माहिती दिल्यास त्यासह आयुष्य स्वीकारणे लवकर शक्य होते म्हणून ‘मितवा’ उपक्रम राबवला जातो, अशी माहिती मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी दिली.
समुपदेशन आणि जाणीव महत्त्वाची
२०१५ पासून आईला एचआयव्हीवरील उपचार सुरू केले गेले. त्याआधी प्रसूतीवेळी आईला आणि बाळाला औषधाचा एक एक डोस दिला जायचा; पण त्यातून बाळाला झालेल्या संसर्गाबद्दल मूल मोठे झाले तरी आई-वडील माहिती देणे टाळतात. तोपर्यंत मुलाचे एआरटी उपचार सुरू झालेले असतात. ते उपचार का दिले जात आहेत याची माहिती आणि जाणीव एआरटी केंद्रांवर करून दिली जाते. मुलांना ही बाब सहज स्वीकारता यावी यासाठी समुपदेशक खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81108 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..