
पाणीपुरवठ्यावरून ‘स्टेम’ची झाडाझडती!
भाईंदर, ता. ४ (बातमीदार): स्टेम प्राधिकरणाकडून मिरा-भाईंदरला कमी पाणीपुरवठ्याची ओरड असतानाच प्राधिकरणाकडून भिवंडीला मात्र मंजूर कोट्यापेक्षा जास्त पाणी दिले जात असल्याचे समोर आले आहे. महापौरांनी पाणी प्रश्नावर आज बोलावल्या विशेष बैठकीत स्टेम अधिकाऱ्यांनी भिवंडीच्या वाढीव पाणीपुरवठ्याची माहिती दिली. त्यावरून महापौरांनी आक्रमक होत स्टेम अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
मिरा-भाईंदरसह ठाणे आणि भिवंडी पालिकांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी स्टेम प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या तीन शहरांच्या पाणीपुरवठ्याचे प्राधिकरणाकडून नियोजन केले जाते; मात्र गेल्या काही दिवसांपासून मिरा-भाईंदरला मंजूर असलेल्या ८६ दशलक्ष लिटर पाण्यापेक्षा कमी म्हणजेच ७४ ते ७५ दशलक्ष लिटर पाणीच मिळत असल्याची पालिकेची तक्रार आहे. याचा शहराच्या पाणी नियोजनावर परिणाम होत असल्यामुळे महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी स्टेमच्या अधिकाऱ्यांना महापालिकेत पाचारण केले होते. त्यावेळी उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती आणि सर्वपक्षीय गटनेते उपस्थित होते.
बैठकीत मिरा-भाईंदरसह ठाणे आणि भिवंडी शहरांना होत असलेल्या पाणीपुरवठ्याची माहिती महापौरांनी मागितली. त्यावेळी भिवंडीला ६७ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असताना दररोज ९० दशलक्ष लिटर पाणी देण्यात येत असल्याचे स्टेम अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले; परंतु स्टेमची गेल्या दोन महिन्यांत बैठक झालेली नाही, या आधीच्या बैठकीतही असा कोणताही निर्णय झालेला नाही, असे असताना भिवंडीला वाढीव पाणी द्यायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा संतप्त प्रश्न महापौरांनी अधिकाऱ्यांना केला. स्टेमकडे अतिरिक्त पाणी असेल तर त्यांनी ते सर्व महापालिकांना समप्रमाणात वाटप केले पाहिजे, अशी समजही महापौरांनी यावेळी दिली.
सोमवारपर्यंत अहवाल द्या
मिरा भाईंदरला कमी पाणी का दिले जाते, असा प्रश्न महापौरांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर मिरा भाईंदरला कापूरबावडी येथे मंजूर कोट्यानुसारच पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा स्टेमच्या अधिकाऱ्यांनी केला.
मात्र स्टेमकडून येणाऱ्या पाण्याचे मोजमाप करण्यासाठी शहराच्या चेणा या प्रवेशद्वारावर मीटर बसविण्यात आले आहेत. यातील रिडिंगनुसार ८६ ऐवजी ७५ दशलक्ष लिटर पाणीच मिळत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
त्यामुळे कापूरबावडी ते चेणा या दरम्यान पाण्याची गळती कुठे होते, याचा शोध स्टेमने पालिकेच्या अधिकाऱ्यांसह घ्यावा आणि त्यासंदर्भातला अहवाल येत्या सोमवारपर्यंत द्यावा, असे आदेश महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81111 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..