
मिरा-भाईंदरकरांना कर सवलत मिळणार!
भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : विशिष्ट मुदतीत मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्या करदात्यांना करात सवलत देण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला अखेर मान्यता मिळाली आहे. गेल्या आठवड्यात महासभा तहकूब झाल्यामुळे करसवलतीचा विषय लांबणीवर पडला होता; मात्र बुधवारी (ता. ४) महापौरांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची विशेष बैठक बोलावून करसवलतीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे येत्या ३० जूनपर्यंत मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्यांना करात पाच टक्के सवलत मिळणार आहे.
मालमत्ता कराचा दरवर्षी प्रामाणिकपणे भरणा करणारे करदाते महापालिका प्रशासनाकडून आतापर्यंत उपेक्षित होते. त्याउलट थकबाकीदारांना मात्र अभय योजनेद्वारे व्याजात सूट दिली जात होती. यामुळे प्रामाणिक करदात्यांमध्ये नाराजी होती. यासाठी ३१ मे पर्यंत मालमत्ता कराचा भरणा केल्यास करात तीन टक्के आणि ऑनलाईन भरल्यास चार टक्के; तर ३० जूनपर्यंत कराचा भरणा केल्यास दोन टक्के आणि ऑनलाईन भरणा केल्यास तीन टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करून गेल्या महिन्यात २९ तारखेला झालेल्या महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. महासभेची मंजुरी मिळाली की १ मेपासून त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी प्रशासनाने केली होती; मात्र २९ तारखेला मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमझान महिन्यातील शेवटचा शुक्रवार असल्यामुळे महासभा तहकूब झाली आणि करसवलतीचा निर्णय लांबणीवर पडला; मात्र करसवलत लवकरात लवकर लागू करण्यासाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी बुधवारी गटनेत्यांची बैठक बोलावून करसवलतीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे प्रशासनाला प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे; मात्र प्रशासनाने तयार केलेल्या प्रस्तावात या वेळी बदल करण्यात आले.
सवलतीची मुदत वाढवली
कर भरण्यासाठी प्रशासनाने दिलेला ३१ मे हा टप्पा काढून टाकण्यात आला आहे. आता ३० जूनपर्यंत मालमत्ता कराचा ऑनलाईन किंवा महापालिका कार्यालयात जाऊन भरणा करणाऱ्यांना सरसकट पाच टक्के सवलत देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शिवाय प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावात केवळ सामान्य करावरच सवलत दिली जाणार होती; मात्र बैठकीत सामान्य करासह देयकात असलेले शासकीय कर वगळता इतर करावरही ही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81114 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..