
कोट्यवधीच्या भूखंडावर कब्जा
वाशी, ता. ४ (बातमीदार) ः सिडको आणि एमआयडीसीच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या मोकळ्या भूखंडावर, मोक्याच्या ठिकाणी नर्सरी (रोपवाटिका) व्यवसाय अनधिकृतपणे सुरू आहे. या नर्सरी राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नर्सरीत आकर्षक फुलाफळांची झाडे, कलमे अशी १०० ते २०० जातीची रोपे विक्रीसाठी असून कोणत्याही
प्रकारची परवानगी न घेता अनेकांनी व्यवसाय थाटले आहेत. या अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नवी मुंबईत नेरूळ, बेलापूर आर्टिस्ट व्हिलेज, सारसोळे गाव, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, कोपरी, ऐरोली, पटनी रस्ता, पाम बीच रस्ता आदी वाहतुकीच्या मार्गांवर तसेच औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मोकळ्या भूखंडांवर बिनदिक्कतपणे नर्सरी सुरू आहेत. शहरात विविध प्रकारच्या गोदामांसाठी चौरस फूट दराने मासिक भुईभाडे आकारले जाते; मात्र नर्सरी व्यावसायिकांकडून सिडको, एमआयडीसी किंवा महापालिकेच्या तिजोरीत एकही दमडी न भरता व्यवसाय सुरू आहेत. इतकेच नव्हे, तर अनेकांना विद्युत पुरवठा करण्यात आल्याचे दिसते.
वाशी ब्ल्यू डायमंड सर्कलसमोरील भगत ताराचंद हॉटेललगत नवी मुंबई पालिकेच्या वतीने स्वच्छ अभियानअंतर्गत उभारलेल्या कारंज्याला एका नर्सरीवाल्याने अक्षरश: विळखा घातला आहे. खैरणे-कोपरी पेट्रोल पंपाजवळ अनेक वर्षांपासून मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण केले आहे; मात्र सिडको किंवा एमआयडीसीकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याचे निर्दशनास येत आहे.
कारवाई करणार
एमआयडीसीचे उपअभियंता शशिकात गित्ते यांच्याशी सपंर्क साधला असता अतिक्रमण केले असल्यास त्या नर्सरी हटवण्यात येतील असे सांगण्यात आले; तर सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रांतबे यांनीदेखील सिडकोच्या अतिक्रमण विभागाला यासंदर्भात माहिती घेऊन अनधिकृत असल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील असे सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81125 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..