
पालघरमध्ये भोंग न लावता अजाण
वसई, ता. ४ (बातमीदार) ः भोंग्यांवरून महाराष्ट्रात वातावरण तापले असतानाच पालघर जिल्ह्यात मात्र बुधवारी सकाळपासून शांततेचे वातावरण होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता; तर सकाळी भोंगे न लावता मशिदीमध्ये अजान देण्यात आली.
वसई-विरार, मिरा-भाईंदर पोलिस आयुक्तालयाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून १०० जणांना नोटिसा बजावल्या होत्या. पहाटे चारपासून सर्वच ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आयुक्त सदानंद दाते, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर हे स्वतः परिस्थितीचा आढावा घेत होते.
बोईसर, पालघर, डहाणू, कासा, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, बोर्डीसह वसई, विरार, नालासोपारा, मिरा रोड, भाईंदरमध्ये सकाळपासून शांततेचे वातावरण पाहावयास मिळाले.
चार मंदिरांत हनुमान चालिसा पठण
मनसेकडून नवघर, मिरा रोड, नयानगर व आचोळे येथे सायंकाळी चार ठिकाणी हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यामुळे यावेळी पोलिस तैनात असणार आहेत; तर काशिमिरा येथील दोन ठिकाणी मंदिरात हनुमान चालिसा पठण करण्यात येणार होती. मात्र, हे आयोजन रद्द करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयाच्या हद्दीत विनास्पीकर मुस्लिम बांधवांनी अजान दिली. कुठेही कायद्याचे उल्लंघन केले नाही. नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- विजयकांत सागर, पोलिस उपायुक्त.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81130 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..