एनएमएमटीला सरकारी डिझेल न परवडणारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एनएमएमटीला सरकारी डिझेल न परवडणारे
एनएमएमटीला सरकारी डिझेल न परवडणारे

एनएमएमटीला सरकारी डिझेल न परवडणारे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : सार्वजनिक वाहतूक उपक्रमांतील वाहनांना सरकारतर्फे येणारे डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई महापालिकेच्या उपक्रमातील एनएमएमटीच्या बसेस खासगी पेट्रोल पंपावर इंधन भरताना दिसत आहेत. बाहेरच्या पेट्रोल पंपावर डिझेल भरत असल्याने महापालिकेची दिवसाला २ ते अडीच लाख रुपयांची बचत होत आहे.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण ५१५ बस आहेत. त्यापैकी परिवहन उपक्रम आणि कंत्राटदाराच्या मिळून, अशा एकूण २१० डिझेलवर चालणाऱ्या बस आहेत. सीएनजीवर चालणाऱ्या ९० आणि इलेक्ट्रीकवर चार्ज करून चालणाऱ्या १८० बस गाड्या आहेत. या बसगाड्यांच्या तुलनेत डिझेलवर धावणाऱ्या २१० बस करिता परिवहन उपक्रमाला दिवसाला १८ हजार लिटर डिझेल लागतो. या बसला डिझेल भरण्यासाठी महापालिकेच्या विविध बसडेपोमध्ये स्वतंत्र पंपाची व्यवस्था आहे. या पंपांना इंडियन ऑयल या कंपनीतर्फे घाऊक दराने डिझेलचा पुरवठा केला जातो. नवी मुंबई महापालिका ही इंडियन ऑइल कंपनीसाठी घाऊक ग्राहक आहे. अलिकडच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डिझेलचे दर वाढल्यानंतर नागरीकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे धोरणात बदल करण्यात आला. त्यानुसार घाऊक स्वरूपात खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे दर वाढवण्यात आले. तर नागरिकांसाठी किरकोळ स्वरूपात इंधन विक्री करणाऱ्यांना दरात सवलत देण्यात आली. या धोरणामुळे महापालिकेला इंडियन ऑइल कंपनीकडून १२५ रुपये प्रति लिटर दराने डिझेल मिळू लागले. त्याउलट जर बाहेरच्या पेट्रोल पंपावर जाऊन डिझेल खरेदी केल्यास एनएमएमटीला १०२ रुपये प्रति लिटरमध्ये मिळते. या हिशेबाने नवी मुंबई महापालिकेला सरकारी दरात डिझेल खरेदी केल्यास दिवसाला ११ लाख २५ हजार रुपये मोजावे लागते. तर खासगी स्वरूपात बाहेरच्या पेट्रोल पंपावर डिझेल खरेदी केल्यास ते १०२ रुपये प्रति दराने ९ लाख १८ हजार रुपयांत मिळते. त्यामुळे महापालिकेने सरकारी दराने डिझेल खरेदी बंद करून आयओसीएल कंपनीच्या पंपावर बाहेरून किरकोळ दरात डिझेल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून नवी मुंबई व पनवेल परीसरातील पंपावर एनएमएमटीच्या बसच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
--------------------------------------
इंधन दरवाढीमुळे उत्पन्नावर संकट
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला महिन्याला सुमारे दहा कोटींचे उत्पन्न आहे. त्यापैकी इंधनावर महापालिकेचे महिन्याकाठी साडे तीन ते चार कोटी रुपये खर्च होतात. यासोबतच देखभाल दुरुस्तीचाही खर्च असतो. दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढते दर पाहता, खर्चाचा आकडा वाढतच जाणार आहे. अशा परिस्थितीत परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नावर संकट आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81147 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top