कल्याणसह अंबरनाथमध्ये स्वतंत्र पाणी योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणसह अंबरनाथमध्ये स्वतंत्र पाणी योजना
कल्याणसह अंबरनाथमध्ये स्वतंत्र पाणी योजना

कल्याणसह अंबरनाथमध्ये स्वतंत्र पाणी योजना

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ४ (बातमीदार) ः कल्याणसह अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात स्वतंत्र पाणीपुरवठा योजना उभारण्यात येणार आहे. ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यांतील गावांसाठी लवकरच निविदा जाहीर केल्या जातील. जल जीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत एकूण ४४.३६ कोटी रुपये किमतीची कामे दोन्ही तालुक्यांमध्ये प्रस्तावित आहेत. ही सर्व कामे मान्सूनपूर्वी सुरू करण्याचे ठरवण्यात आले आहे. या योजनेमुळे गेल्या अनेक दशकांपासूनची पाणी प्रतीक्षा संपली असून, या गावांमध्ये स्वतंत्र पाणी योजना राबवण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी भागातील पाण्याचा प्रश्न मिटल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना राबवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पाणी योजनांसाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून निधी मिळावा म्हणून त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार दांगडे यांनी संबंधित गावांची पाहणी करत त्याचा सविस्तर प्रकल्प अहवालही तयार केला होता. ही प्रक्रिया वेगाने पार पाडल्यानंतर आता लवकरच जीवन मिशनअंतर्गत विविध गावांच्या नळपाणी योजनेसाठी निविदा जाहीर केल्या जाणार आहेत. जल जीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घराला ५५ लिटर प्रतिमाणसी याप्रमाणे नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
अंबरनाथ तालुक्यातील पिंपरी कर्म नगरी; तर कल्याण तालुक्यातील खोणी (खोणी, खोणी वडवली, खोणी अंताली), म्हारळ बु. पाली अशा एकूण चार योजनांना ५.१३ कोटी रकमेची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या चार योजनांची निविदा प्रक्रिया सुरू असून, मान्सूनपूर्वी कार्यादेश देऊन कामे सुरू करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.

कल्याणची सद्यस्थिती
१) दरडोई खर्चाच्या निकषांपेक्षा जास्त किंमत असणाऱ्या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार राज्य सरकारकडे आहेत. त्याअनुषंगाने कल्याण तालुक्यातील शिरढोण, वडवली व अंबरनाथ तालुक्यांतील पोसरी शेलार पाडा, चिरड आदी ठिकाणी एकूण ३.६८ कोटींच्या चार योजना दरडोई खर्चाच्या निकषांपेक्षा जास्त असल्याने त्या प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आल्या आहेत.
२) जिल्हा परिषदेमार्फत दोन कोटी रुपयांपर्यंतच्या; तर दोन कोटींपेक्षा जास्त किमतीच्या योजनांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तांत्रिक मान्यता देण्यात येते. त्याअनुषंगाने कल्याणमधील म्हारळ खुर्द, वरप आणि कांबा आदी गावांत एकूण ११.४४ कोटी रकमेच्या तीन योजनांचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवून तांत्रिक मान्यतेसाठी प्राधिकरणास सादर केले आहेत.

अंबरनाथचा आढावा
१) अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत नेवाळी, मांगरूळ, खरड अशी तीन गावे व १४ पाडे मिळून १२.५० कोटी रकमेच्या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून पुढील अंमलबजावणीसाठी प्राधिकरणाकडे सादर केला आहे. या योजनेस तांत्रिक मान्यता देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.
२) पर्यटन विकास योजनेंतर्गत हाजीमलंग वाडी पहाडावर पाणी साठवण बंधारे दुरुस्ती व मोठ्या विहिरींच्या दुरुस्तीची ६८.६१ लाखांची दोन कामे मंजूर केली. या दोन्ही कामांचे कार्यादेश दिल्यानंतर ही कामे प्रगतिपथावर आहेत. मान्सूनपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81150 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top