
सात वर्षांच्या चिमुरडीसह आईची रेल्वेखाली आत्महत्या
पालघर, ता. ४ (बातमीदार) : सात वर्षांच्या चिमुरडीसह आईने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.३) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पश्चिम रेल्वेच्या सफाळे व केळवे रोड स्थानकांदरम्यान घडली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिले. तृप्ती आरेकर (३० वर्षे) असे आईचे नाव असून जिगिशा आरेकर (७ वर्षे, मुलगी) अशी मृतांची नावे असून त्या पालघर तालुक्यातील पोफरण (अक्करपट्टी) येथील राहणाऱ्या होत्या. मंगळवारी रात्री मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सौराष्ट्र एक्स्प्रेसखाली त्यांनी आत्महत्या केली. याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना घटनास्थळी एका दुचाकीसह रुळामध्ये पडलेले आधार कार्ड व मोबाईल फोन आढळून आले; मात्र मोबाईलमधील सीमकार्ड आधीच काढून फेकून देण्यात आले होते; तर आधार कार्डवरील माहितीवरून त्यांची ओळख पटल्याने रात्री उशिराने सफाळे रेल्वे पोलिस ठाण्यात नातेवाईक पोहोचले. दोघी मायलेकींनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून सफाळे रेल्वे पोलिस त्याचा अधिक तपास करीत आहेत; तर या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या काही काळ रोखून ठेवण्यात आल्या होत्या.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81163 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..