ठाण्यात मनसेचा फुसका ‘भोंगा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात मनसेचा फुसका ‘भोंगा’
ठाण्यात मनसेचा फुसका ‘भोंगा’

ठाण्यात मनसेचा फुसका ‘भोंगा’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ४ ः मशिदीवर पहाटे भोंगा वाजला तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवणार, असा इशारा देणाऱ्या मनसेच्या आंदोलनाचा ‘भोंगा’ फुसका निघाल्याचे आज ठाण्यात दिसून आले. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि धरपकडीमुळे काल-परवापर्यंत इशारे, आव्हाने देणारे ठाण्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना ‘रस्त्यावर’ सोडून भूमिगत झाल्याचे पाहायला मिळाले; तर दुसरीकडे मुस्लिम समाजाने सामंजस्य दाखवत मशिदीमध्ये पहाटेची अजान भोंग्याविना दिली. त्यामुळे ठाण्यातील इंदिरानगर भागाचा अपवाद वगळता मशिदीबाहेर हनुमान चालिसा वाजवण्याचे मनसेचे मनसुबे उधळले गेले.
मशिदीवरील भोंगे पोलिसांनी काढले नाहीत तर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणारच, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याने हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार मनसेच्या वतीने करण्यात आला होता. तसेच भोंगा उतरवला नाही तर मुंब्रा येथील मशिदीबाहेर संघर्ष करणार, असे आव्हान अविनाश जाधव यांनी दिल्याने ठाण्यात भोंग्याचा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील महत्त्वाच्या व संवेदनशील परिसरातील मशिदींच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता; तर दुसरीकडे ठाणे पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात करून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाल्यावर शहरातील मनसेचे प्रमुख नेते भूमिगत झाल्याचे दिसून आले.

दृष्टिक्षेप...
१) राबोडी या मुस्लिमबहुल वस्तीत मशिदींमध्ये बुधवारी पहाटेची अजान ही भोंग्याविनाच झाली. त्यानंतर दुपारच्या सत्रात भोंग्यावर अजान घेण्यात आली. येथील मशिदीबाहेर पोलिसांकडून आवाजाची तीव्रता तपासली जात होती.
२) वागळे इस्टेट येथील इंदिरा नगर भागात मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न झाला, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित प्रकार टाळला गेला.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार आम्ही पहाटेची अजान भोंग्याविना घेतली. त्यानंतर आम्ही नियमांचे पालन करीत दुपारची अजानदेखील कमी आवाजात पठण केली.
- अब्दुल सल्मान बांगी, उपाध्यक्ष, राबोडी मशीद ट्रस्ट

मशिदींच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मशिदीतदेखील सकाळची अजान ही भोंग्याविना झाली; तर येथील आवाजाची क्षमता मोजण्यासाठी यंत्रेदेखील ठेवण्यात आली.
- संतोष घाटेकर, वरिष्ठ निरीक्षक, राबोडी पोलिस ठाणे

३०० हून अधिक पदाधिकारी ताब्यात
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‍भवू नये, याकरिता ठाणे पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावत अनेक पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार ठाणे पोलिसांनी सुमारे ३०० हून अधिक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81171 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top