
सहा महिन्यांत एसटीचा २८२४ कोटींचा तोटा
मुंबई, ता. ४ ः एसटी कर्मचाऱ्यांच्या बेकायदा संपामुळे एसटीची प्रवासी सेवा तब्बल सहा महिने बंद होती. परिणामी, विविध माध्यमांतून येणाऱ्या उत्पन्नावर एसटीला पाणी सोडावे लागले. सहा महिन्यांत प्रवासी वाहतुकीचा तब्बल २८२४ कोटी सहा लाख ९१ हजारांचा महसूल बुडाला. मालवाहतुकीला सुमारे ३५ कोटींचा फटका बसला आहे. आधीच सुमारे दोन हजार कोटींपेक्षा अधिक तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला आता बेकायदा संपातील बुडालेल्या उत्पन्नाचाही फटका बसला आहे.
एसटी विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी संघंटनांच्या संयुक्त कृती समितीने बेमुदत आंदोलन उभारले होते. परिवहन मंत्री अनिल परब यांनी यशस्वी वाटाघाटी केल्यानंतर संयुक्त कृती समितीने आंदोलन मागे घेतले होते; मात्र त्यानंतर ३ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संघटनाविरहित संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नोव्हेंबरपासून एसटीच्या २५० आगारांतील सेवा हळूहळू ठप्प झाली. काही ठिकाणी अंशतः सुरू असलेली सेवासुद्धा संपकरी कर्मचारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी बंद पाडल्याने एसटीच्या तिजोरीला कुलूप लागले होते. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत प्रवासी तर घटलेच शिवाय उत्पन्नही बुडाले. सर्वाधिक फटका पुणे विभागाला बसला असून त्यानंतर औरंगाबाद आणि नाशिक विभागाचा समावेश आहे.
२७ नोव्हेंबर ते २० एप्रिल कालावधीतील तोटा
प्रदेश तोटा
पुणे ः ६४६ कोटी ८७ लाख ८७ हजार
औरंगाबाद ः ५८३ कोटी ६२ लाख ७१ हजार
नाशिक ः ५११ कोटी १६ लाख ३१ हजार
मुंबई ः ४९८ कोटी ६१ लाख ६५ हजार
नागपूर ः २९८ कोटी ३७ लाख ३५ हजार
अमरावती ः २८५ कोटी ४१ लाख २ हजार
सर्वाधिक फटका बसलेले आगार
औरंगाबाद प्रदेशात सर्वाधिक तोटा नांदेड आगारात झाला आहे. एकट्या नांदेड आगारात १०९ कोटी ४० लाख ६३ हजारांचे उत्पन्न बुडाले आहे. त्याप्रमाणेच मुंबई प्रदेशात रत्नागिरी (११४ कोटी ६० लाख ७३ हजार) आणि ठाणे (१२७ को) आगार तोट्यात आहे. पुणे प्रदेशात सर्वाधिक फटका कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सोलापूर आगाराला बसला आहे. कोल्हापूर १३२ कोटी २९ लाख ६५ हजार, पुणे १७९ कोटी ८२ लाख ४२ हजार आणि सातारा १२३ कोटी ८१ लाख ४२ हजार अशी आकडेवारी आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81189 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..