
मनसेच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांनी धरपकड
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात उठवलेल्या आवाजाच्या पार्श्वमीवर नवी मुंबईतील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मशिदीसमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी बुधवारी अनेक पदाधिकाऱ्यांची धरपकड केली. दरम्यान, नवी मुंबईत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून परिमंडळ- १ च्या हद्दीतील मनसेच्या ३० प्रमुख पदाधिकाऱ्यांना मंगळवारी ताब्यात घेतले होते.
राज ठाकरे यांनी भाषणातून मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी दिलेल्या मुदतीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मशिदीसमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबईत बुधवारी ऐरोली, नेरूळ, सानपाडा येथील माशिदीसमोर हनुमान चालिसा वाचून आंदोलन केले. त्यामुळे रबाळे, नेरूळ आणि सानपाडा पोलिसांनी मनसेच्या ११ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, शहरात धार्मिक तेढ निर्माण होऊन स्थानिक पातळीवरील परिस्थिती चिघळण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून मंगळवारपासूनच मनसे पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवेल असे कृत्य करू नये, अशी समज पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना या नोटीसद्वारे दिली गेली होती. तसेच परिमंडळ- १ मधील २७ पदाधिकाऱ्यांना सीआरपीसी कायद्यान्वये कलम १५१ (१) नुसार; तर मुंबई पोलिस कायदा कलम (६८) अन्वये ३ अशा एकूण ३० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81194 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..