
मुंब्य्रात पहाटे अजानचा भोंगा वाजला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : मनसेने दिलेले आव्हान मोडित काढत बुधवारी मुंब्य्रातील १० मशिदींमध्ये पहाटे अजानची बांग भोंग्यावरून गुंजली. या वेळी नेहमीपेक्षा आवाजाची तीव्रता कमी होती. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त सर्वच मशिदींबाहेर होता. त्यामुळे दुप्पट आवाजात हनुमान चालिसापठणाचे भोंगे वाजवण्याचा मनसेचा इशारा हवेतच विरला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, मुंब्य्रातील इतर छोट्या मशिदींनी न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत भोंग्यांच्या आवाजाची मर्यादा पाळणार, मात्र भोंगे उतरवणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे गेले दोन दिवस मुंब्रा परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
मुस्लिमबहुल मुंब्य्रात छोट्यामोठ्या सुमारे ८५ मशिदी आहेत. या मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्यात यावेत, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करावे; अन्यथा दुप्पट आवाजात मशिदींबाहेर हनुमान चालिसेचे पठण करू, असा इशारा ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यासाठी पहाटेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते धडकतील, असा इशाराही देण्यात आला. या पार्श्र्वभूमीवर सोमवारपासून मुंब्य्रात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. विशेषतः येथील १० मोठ्या मशिदींबाहेर खडा पहारा देण्यात येत होता. मुंब्रा दिशेने येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येत होती.
अनुचित प्रकार नाही
मुंब्य्रात कायदा व सुव्यवस्थेसह शांतता राहावी यासाठी काही दिवसांपूर्वीच मस्जिद कमिटीने सर्व मशिदींच्या मौलवींशी संवाद साधला. तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शहरातील बहुतेक मशिदींनी पहाटे भोंग्यावरून अजान देण्याचे टाळले असल्याची माहिती मौलवी मुफ्ती यांनी दिली, पण मुख्य जामा मशिदीसह १० मोठ्या मशिदींनी मनसेचे आव्हान स्वीकारत नेहमीप्रमाणे पहाटेच्या अजानची बांग भोंग्यावरून दिली. या वेळी पोलिस बंदोबस्त असल्याने येथे मनसे कार्यकर्ते फिरकलेच नसल्याचे दिसून आले. त्यानंतर दुपारची अजान सर्वच मशिदींनी भोंग्यांवरून दिल्याचे दिसून आले. यादरम्यान शहरामध्ये तणावपूर्ण शांतता होती; मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
मनसेला पहिला विरोध हिंदू करतील
कितीही परिस्थिती बिकट असली, तरी मुंब्य्रात आतापर्यंत एकही दंगल घडली नसल्याचा इतिहास आहे आणि भविष्यातही अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची खबरदारी येथील हिंदू व मुस्लिम समाज घेत असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या. इतकेच नव्हे, तर जर तुम्ही आलात तर पहिला विरोध हिंदू बांधव करतील. यापूर्वी येथे शांतता बिघडवणाऱ्यांना हनुमंताचा प्रसाद कसा मिळाला आहे याची माहिती करून घ्या आणि मगच मुंब्य्रात पाऊल ठेवा, असा इशाराही देण्यात आला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81206 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..