ठाणे : चार महापालिकांमध्ये निवडणुकांचा बिगुल पुन्हा वाजणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि नवी मुंबई या ठाणे जिल्ह्यातील चार महापालिकांमध्ये लवकरच सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल
निवडणुकांचा बिगुल पुन्हा वाजणार

ठाणे : चार महापालिकांमध्ये निवडणुकांचा बिगुल पुन्हा वाजणार

ठाणे : प्रशासकीय राजवटीच्या छायेत असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि नवी मुंबई या ठाणे जिल्ह्यातील चार महापालिकांमध्ये लवकरच सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. आधी कोव्हिड आणि नंतर ओबीसी आरक्षणाच्या गुंत्यांमुळे या महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम रद्द होऊन त्या पुढे ढकलल्या गेल्या होत्या. मात्र आता सर्वोच्च न्यायालयानेच दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिल्याने सर्वच राजकीय पक्षांसह ‘इच्छुक’ उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

कोरोनामुळे कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वप्रथम लांबणीवर पडली. त्यामुळे तेथे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यानंतर कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या ठाणे महापालिकेची निवडणूक नियोजित वेळेत फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती; पण निवडणूक कार्यक्रमच जानेवारीमध्ये जाहीर झाल्याने निवडणुका लांबवणीवर पडणार असल्याचे संकेत मिळाले. त्यातही चारऐवजी तीन सदस्य पॅनल, प्रभाग रचना वादात पडली; पण या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याने राज्य सरकारने ठाम भूमिका घेत निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामुळे कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईसह ठाणे, उल्हासनगर महापालिकांच्या निवडणुकाही रद्द होऊन गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासकीय राजवट लागली.

प्रशासकीय राजवट लागल्याने पालिकांचा सर्व कारभार प्रशासनाच्या हाती गेला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचा हिरमोड झाला. निवडणुका कधी होणार, याविषयी शाश्वती नसल्याने आपल्या मतदारसंघामध्ये अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी माजी नगरसेवक झटत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे खर्चही वाढल्याने निवडणुकीआधीच ‘फंड’ संपण्याची चिंता त्यांना लागली आहे. त्यामुळे निवडणुका कधी होणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुकांच्या नजरा लागल्या आहेत; पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे त्यांचा जीव काही अंशी भांड्यात पडला आहे. वास्तविक राज्य सरकारने डिसेंबर २०२२ पर्यंत अवधी मागितला होता. तो अवधी देण्यास नकार दिल्यानंतर सरकारने पावसाळ्याचे कारण दिले; पण मुदत वाढवता येणार नाही, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात महापालिकांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

निवडणुका कधीही लागल्या, तरी शिवसेना सज्ज आहे. सत्ता असो वा नसो, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यासह जिल्ह्यातील इतर महापालिकांमध्ये विकासकामे सुरूच आहेत. राहिला प्रश्न ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात, तर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. मतदार सुज्ञ आहे.
- नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसींच्या आरक्षणाशिवाय होण्याची शक्यता आहे. हे महाविकास आघाडी सरकारचे आणखी एक ढळढळीत अपयश आहे. आघाडीच्या बेजबाबदारपणाचा फटका ओबीसींनी का सहन करायचा?
- निरंजन डावखरे, आमदार, भाजप

निवडणुका जाहीर झाल्यास राजकीय पक्ष म्हणून आम्ही निवडणुका लढण्यास तयार आहोत. फक्त ओबीसींचे राजकीय आरक्षण या निर्णयामुळे रद्द झाले आहे. त्याच्यामुळे ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय होणार आहे.
- आनंद परांजपे, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81235 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top