इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित
इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित

इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवित

sakal_logo
By

वाशी, ता. ५ (बातमीदार) : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय दोन आठवड्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे दोन वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होण्याची अपेक्षा राजकीय वर्तुळात सुरू असून इच्छुक उमेदवारांच्यादेखील आशा पल्लवित झाल्या आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी असहमती दर्शविली होती. राज्य विधिमंडळात यासंदर्भातील कायदाही मंजूर करण्यात आला होता. मागासवर्गीय आरक्षण निश्चित झाल्याशिवाय या निवडणुका नकोत, या भूमिकेमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडलेल्या होत्या. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी लांबणीवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती; पण सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता निवडणुका लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई पालिकेच्या सभागृहाची मुदत १० मे २०२० रोजी संपली आहे. कोरोना साथीमुळे एप्रिल २०२० मध्ये होणारी निवडणूक अनिश्चित काळासाठी निवडणूक आयोगाने पुढे ढकलली होती. त्यानंतर कोरोनाची लाट ओसरली की निवडणुकीची लाट उसळून वर आली होती. पालिका निवडणूक असल्याने कोरोना काळात इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या पक्षांनी आरोग्य कामे केली.

नवी मुंबई महापालिकेच्या मागील दोन वर्षात पाच वेळा निवडणुकांची तयारी इच्छुक उमेदवारांनी केली होती; तर वारंवार निवडणूक लांबणीवर पडल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक उमेदवार चांगलेच अडचणीत आले होते. राजकीय पक्ष, इच्छुक उमदेवारांसह हौशे, नौशेही आता जवळपास थंडावले होते; तर एकदाच्या निवडणुका होऊन जाण्याची अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली होती.

चौकट
शिवसेना निवडणुकीसाठी कधीही तयारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही; पण आता सरकारने आणि निवडणूक आयोगाने त्याबद्दल निर्णय घ्यावा.
- विठ्ठल मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख, नवी मुंबई

निवडणूक कधीही लागली तरी भाजप तयार आहे; पण महाविकास आघाडी सरकार निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी काही तरी पळवाट काढील. महाविकास आघाडी सरकार हे पराभवाच्या भीतीने निवडणुका घेण्यासाठी घाबरत आहे.
- रामचंद्र घरत, भाजप जिल्हाप्रमुख, नवी मुंबई

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणावर गदा आलेली आहे; पण न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो; मात्र ओबीसी समाजावर हा अन्याय आहे.
- अनिल कौशिक, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष, नवी मुंबई

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणुका होतील; पण ओबीसी समाजावर हा मोठा अन्याय आहे. निवडणुका होणार असल्याने उमेदवारांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण आहे.
- अशोक गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस, जिल्हा अध्यक्ष, नवी मुंबई

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81242 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top