
पालघरमधील टंचाईग्रस्त १५ गावांना दिलासा
पालघर, ता. ५ (बातमीदार) ः झांझरोली धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने गेल्या १५ दिवसांपासून पालघरमधील १९ गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण यांनी धरणाला भेट दिली. त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात सक्शन पंप बसवून पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यानुसार सक्शन पंप बसवून झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत सुरू होईल, असेही अध्यक्षांनी सांगितल्याने १५ गावांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या पावसाळ्यात झांझरोली धरणाला भगदाड पडले होते. त्यावेळी तात्पुरती दुरुस्ती केली होती. कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर गेल्या १५ दिवसांपूर्वी या धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे १९ गावांचा पाणीपुरवठा बंद होता. दरम्यान, धरणाची दुरुस्ती होण्यास अजूनही काही काळ जाणार आहे. टॅंकरने पाणीपुरवठा करणे आर्थिक दृष्टीने परवडणारे नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण यांनी आज झांझरोली धरणाला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात सक्शन पंप लावून पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना केल्या. यावेळी केळवेच्या सरपंच भावना किणी उपस्थित होत्या.
टँकरद्वारे पाणीपुरवठ्याला मर्यादा
प्रखर उन्हाळा, त्यात पाण्याची वाढती गरज, त्यामुळे या गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. याविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता. या गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशीही मागणी केली जात होती. केळवे ग्रामपंचायतीने आपल्या गावातील ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष होते, त्या ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला होता; तर काही सामाजिक संस्थांनीही पिण्याच्या पाण्याचा मोफत पुरवठा सुरू केला होता; परंतु यालाही मर्यादा होत्या. सक्शन पंपाद्वारे पाणीपुरवठा होणार असल्याने ग्रामस्थांची गैरसोय टळणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81248 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..