
३५० मालमत्तांचा ऑनलाईन लिलाव होणार
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांच्या मालमत्ता प्रशासनाने जप्त केल्या आहेत. अशा जप्त केलेल्या ३५० मालमत्तांचा आता ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. लिलाव आयोजित करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून, येत्या २० ते २५ दिवसांत महापालिकेच्या संकेतस्थळावर हा ऑनलाईन लिलाव पुकारण्यात येईल, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली. वर्षानुवर्षे कराचा भरणा न करणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता प्रशासनाने जप्त केल्या आहेत. त्यांची संख्या सुमारे ३५० इतकी आहे. या थकबाकीदारांकडे पालिकेची सुमारे आठ कोटी रुपयांची कर थकबाकी आहे.
जप्त केलेल्या मालमत्ता सील करून पालिकेने स्वत:च्या ताब्यात ठेवल्या आहेत. मालमत्तांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता त्यांचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. लिलाव करण्याचा प्रस्तावही अंतिम टप्प्यात असून हा लिलाव पालिकेच्या संकेतस्थळावर पुकारण्यात येणार आहे. त्याची संपूर्ण माहिती आणि मालमत्तांचे तपशील पालिका प्रसिद्ध करणार आहे.पहिल्या टप्प्यात ३५० पैकी ३० मालमत्तांचा ऑनलाईन लिलाव करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित मालमत्तांचा लिलाव होईल. या लिलावात कोणालाही भाग घेता येणार आहे. ३० मालमत्तांपैकी प्रत्येक मालमत्तेसाठी स्वतंत्र बोली लावता येणार आहे.
शेवटची एक संधी
लिलाव पुकारण्याआधी थकबाकीदारांना मिरा-भाईंदर पालिकेकडून आणखी एक संधी दिली जाणार आहे. सध्या चालू वर्षाची कराची देयके छापण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मालमत्ता जप्त केलेल्या थकबाकीदारांनी अजूनही थकबाकीसह चालू वर्षाचा कर भरला तर त्यांची मालमत्ता लिलावातून वगळण्यात येणार आहे, अशी माहिती कर विभागाचे सहाय्यक आयुक्त सुदाम गोडसे यांनी दिली.
...अन्यथा पालिका ताबा घेणार
लिलावाद्वारे मिळालेल्या रकमेतून पालिकेचा कर आणि इतर खर्च त्यातून वसूल करून उर्वरित रक्कम थकबाकीदाराला दिली जाणार आहे. ऑनलाईन लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही तर मालमत्तांचा ऑफलाईन लिलाव पुकारण्यात येणार आहे. मात्र ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही लिलावांना प्रतिसाद मिळाला नाही तर या मालमत्ता स्थायी समितीच्या मान्यतेने नाममात्र एक रुपयात विकत घेऊन महापालिका त्या आपल्या ताब्यात घेणार आहे. या मालमत्तांचा वापर कर्मचाऱ्यांचे निवासस्थान अथवा महापालिकेच्या कार्यालयांसाठी केला जाणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81249 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..