
शिवडीतील आरोग्य केंद्रात सौरऊर्जेचा वापर
शिवडी, ता. ५ (बातमीदार) ः शिवडी पूर्व परिसरातील शिवडी कोळीवाडा येथील नागरिकांच्या आरोग्याच्या सोयीसाठी शिवसेनेच्या प्रयत्नाने शिवसेनाप्रमुख ‘बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र’ उभारण्यात आले आहे. हे मुंबईमधील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे आरोग्य केंद्र असून कंटेनरमध्ये चालू करण्यात आले आहे.
या केंद्राचा लोकार्पण सोहळा बुधवारी (ता.४) पार पडला. या वेळी माजी नगरसेवक सचिन पडवळ, शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या आरोग्य केंद्रासाठी चार कंटेनरचा वापर एकत्रितरीत्या करून त्यामध्ये आरोग्य केंद्रासाठी लागणाऱ्या डॉक्टर रूम, औषधालय, क्लिनिकल रूम बनवण्यात आले आहेत. केंद्रात चार एअर कंडिशनर, १६ ट्युब, आठ पंखे, एक फ्रिज, आणि दोन कॉम्प्युटरचा वापर केला जात आहे. केंद्राच्या छतावर १५ सोलार पॅनेल बसवण्यात आले आहेत. या पॅनेलद्वारे प्रतिदिन सहा के.डब्ल्यू.पी. ऊर्जानिर्मिती होते. त्यामधून प्रतिदिन २४ युनिट वीज निर्माण करून त्यावर उपकरणे चालत आहेत. यामुळे महापालिकेचे वर्षाला ४८ हजार ते ६० हजार रुपये बचत होणार आहे. आरोग्य केंद्रात नेहमी १५० ते २०० रुग्णांची आरोग्य तपासणी, तसेच त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जातात, अशी माहिती माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81250 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..