विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका
विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका

विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका

sakal_logo
By

भाईंदर, ता.५ (बातमीदार): बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून मिरा-भाईंदर पालिकेतील सत्ताधारी भाजपने विकासकामांच्या उद्‍घाटनांचा धडाका उडवून दिला आहे. १६ मे रोजी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिकेने बांधलेले उपासना केंद्र, तरणतलाव, अग्निशमन दलासाठी घेतलेले अत्याधुनिक वाहन यांचे उद्घाटन, तसेच बीएसयुपी योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या किल्ल्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री एकनाथ शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.
२०१७ मध्ये झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता मिळाल्यास बुद्धविहाराची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार महापालिकेने उपासना केंद्र बांधले असून त्यात स्तूप, सभागृह, वाचनालय, परिषद सभागृह आणि कार्यालय आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. या उपासना केंद्राचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, या वास्तूचा वापर कशा पद्धतीने केला जावा याबाबत बौद्ध समाजातील विविध व्यक्तींशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली.
याव्यतिरिक्त महापालिकेला लोढा गृह संकुलात मिळालेल्या सुविधा भूखंडावर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव बांधण्यात आला आहे. या तलावाचे लोकार्पण यावेळी करण्यात येणार आहे. शहरात सध्या उभारण्यात येत असलेल्या टोलेजंग इमारतींसाठी महापालिकेने अत्याधुनिक अग्निशमन वाहन खरेदी केले आहे. या वाहनाद्वारे तीस माळ्यापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. या वाहनाचे उद्घाटन, तसेच काही दिवसांपूर्वीच पालिकेने बीएसयुपी योजनेतील लाभार्थ्यांसाठी काढलेल्या सोडतीत घरांचे आरक्षण मिळालेल्या लाभार्थ्यांना किल्ल्यांचे वाटपही यावेळी करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिली. या कार्यक्रमात राजशिष्टाचाराचे पूर्णपणे पालन करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.

उशिरा सुचलेले शहाणपण!
महापालिकेने बांधलेल्या तरण तलावासाठी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विशेष प्रयत्न केले होते. गृह संकुलातील भूखंडावर तरण तलाव बांधण्याची संकल्पना सरनाईक यांची होती. त्यामुळे या तरण तलावाचे लोकार्पण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येत असल्याबद्दल सरनाईक यांची प्रतिक्रिया घेतली असता विकासकामांचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे हा सर्वस्वी सत्ताधारी पक्षाचा अधिकार आहे. त्यावर आम्हाला कोणताही आक्षेप नाही. मात्र भाजपला राजशिष्टाचाराचे पालन करण्याचे उशिरा सुचलेले शहाणपण स्वागतार्ह आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81253 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top