विरोधकांच्या सभात्यागानंतरही अर्थसंकल्‍प मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरोधकांच्या सभात्यागानंतरही अर्थसंकल्‍प मंजूर
विरोधकांच्या सभात्यागानंतरही अर्थसंकल्‍प मंजूर

विरोधकांच्या सभात्यागानंतरही अर्थसंकल्‍प मंजूर

sakal_logo
By

पनवेल (बातमीदार) : पनवेल महापालिकेच्या आर्थिक वर्ष २०२१-२२ चे सुधारित व २०२२-२३ चे मूळ अर्थसंकल्प गुरुवारी सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. यावेळी विरोधकांनी मालमत्ताकराचा व पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यापेक्षा श्रेय नामावलीसाठी सभात्याग केल्‍याने अवघ्‍या पाच मिनिटांत अर्थसंकल्‍प मंजूर करण्यात आला.
अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर सीता पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आदी उपस्थित होते.
स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांनी अर्थसंकल्पाची प्रत महापौरांना सादर केली. यावेळी काही नेत्‍यांची नावे न घेतल्‍याने विरोधकांनी गोंधळ सुरू झाला. विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, अरविंद म्हात्रे, डॉक्टर सुरेखा मोहकर व गणेश कडू यांनी महापौरांच्या आसनासमोर जाऊन निषेध केला तर प्रीतम म्हात्रे यांनी नरेश ठाकूर यांच्यासमोरचा माईक बंद केला. विरोधकांच्या गोंधळातच महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी अंदाज पत्रक मंजूर झाल्याचे जाहीर केले.

अर्थसंकल्प महासभेपुढे येतो तो त्यावर चर्चा करण्यासाठी. मात्र विरोधकांनी कोणाचे नाव घेतले, कोणाचे नाही यासाठी सभात्याग केला हे अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही आर्थिक बाबींवर त्यांनी आपले मत मांडलेले नाही. सभापती मनोगत व्यक्त करतात ते त्यांचे वैयक्‍तिक असते. मात्र त्‍या कारणामुळे विरोधकांनी सभात्याग केला असेल तर ते चुकीचे आहे.
- डॉ. कविता चौतमोल, महापौर

विरोधकांना अर्थसंकल्‍पावर चर्चा करायची असती तर ते अर्धा तास आधी आले असते. त्यांना केवळ अडथळाच आणायचा होता. अर्थसंकल्‍पातील तरतुदींवर चर्चा होणे अपेक्षित होते, त्‍यावर सूचना करणे अपेक्षित असते. मात्र शुल्‍लक कारणाने सभात्‍याग करणे चुकीचे आहे. त्‍यामुळे उपलब्ध मनुष्‍यबळात अर्थसंकल्‍पाला मंजुरी देण्यात आली.
- परेश ठाकूर, सभागृह नेते


पनवेलचा अर्थसंकल्‍प हा शहराचा विकासाचा नसून भाजपच्या विकासाचा आहे. शहरातील विकास कामे मंजूर करताना सगळ्या सदस्यांना विश्वासात घेणे आवश्‍यक आहे. मालमत्ता कर व पाणी पुरवठ्याच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यास सत्ताधाऱ्यांना वेळ नाही.
- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्ष नेते

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81267 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top