
कल्याण-डोंबिवलीत ‘सायकल-वॉक’ मार्गिका
कल्याण, ता. ५ (बातमीदार) ः ‘माय सिटी फिट सिटी’ या संकल्पनेंतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनी नागरिकांच्या शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांची आरोग्य सृदृढ रहावे यासाठी येत्या शनिवारपासून (ता. ७) कल्याण-डोंबिवलीतील प्रत्येकी एक मार्गिका सकाळी पाच ते आठ या वेळेत सायकल आणि वॉकिंगसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या वेळेत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांसमवेत केंद्र सरकारच्या ‘फ्रिडम-२ वॉक’ या स्पर्धेत स्वत: सहभागी होऊन पालिकेस प्रथम पुरस्काराचा मान मिळवून दिला. त्याचप्रमाणे अंदाजपत्रकातही ‘माय सिटी, फिट सिटी’ अंतर्गत पालिका क्षेत्रातील खेळाडूंसाठी भरीव तरतूद केली आहे. आता याच्याही पुढे जात आयुक्तांनी शहरातील प्रदूषण कमी व्हावे, वाहतूक कोंडी कमी व्हावी, या दृष्टिकोनातून ‘सायकल संस्कृती’ वाढविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार कल्याण व डोंबिवलीतील प्रत्येक एक रस्ता सकाळी ५ ते ८ या वेळेत सायकलिंग आणि वॉकिंगसाठी उपलब्ध राहणार आहे.
हे रस्ते राहणार राखीव
पत्रीपूल ते ठाकुर्ली (९० फुटी रस्ता) हा सुमारे २ किलोमीटर रेल्वे समांतर रस्त्यावर पदपथाच्या बाजूची मार्गिका चालण्यासाठी आणि दुभाजकाच्या बाजूची मार्गिका सायकलिंगसाठी उपलब्ध राहील. त्याचप्रमाणे कल्याण रिंग रोडवर गांधारे पूल ते बारावे घनकचरा प्रकल्पापर्यंत नदीच्या बाजूने चालण्यासाठी तर विरुद्ध बाजू सायकलिंगसाठी उपलब्ध राहणार आहे.
येत्या शनिवारपासून शहरातील एक मार्गिका दररोज सायकलिंग आणि वॉकिंगसाठी सकाळी पाच ते आठ या वेळेत राखीव राहणार आहेत. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन ‘माय सिटी, फिट सिटी’ या संकल्पनेला प्रतिसाद द्यावा.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, केडीएमसी.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81270 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..