
७५ टक्के नागरिक दुहेरी लसवंत
मुंबई, ता. ५ : राज्यात लसीकरणाचा वेग कमी झाला असून जवळपास १.७७ कोटी लाभार्थ्यांनी कोविड प्रतिबंधात्मक लशीचा दुसरा डोस चुकवला आहे. आतापर्यंत राज्यातील ९२.२१ टक्के नागरिकांचा पहिला डोस, तर ७५ टक्के नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना यापूर्वीच यंत्रणेला दिल्या आहेत; मात्र नागरिकच लसीकरण केंद्रापर्यंत येत नसल्याने लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत आहे.
राज्यात मुंबईत १०० टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहे. दरम्यान, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पहिला डोस १०० टक्के पूर्ण, तर दुसऱ्या डोसचे प्रमाण अनुक्रमे ९२ टक्के, ८९.६७ टक्के आणि ८७.०२ टक्के आहे. दरम्यान, राज्यातील धुळे, अकोला, हिंगोली, नांदेड, बीड आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश सर्वात कमी लसीकरण करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये होतो आहे. धुळ्यात ८०.०८ टक्के, अकोल्यात ८०.०३ टक्के, हिंगोलीत ७९.७४ टक्के, नांदेडमध्ये ७९.१८ टक्के, बीडमध्ये ७७.५६ टक्के, नंदूरबारमध्ये ७३.५८ टक्के एवढेच लसीकरण झाले आहे, तर दुसऱ्या डोसचे प्रमाण या जिल्ह्यांमध्ये ५० ते ६५ टक्क्यांमध्ये आहे.
राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये पहिला डोस ९० ते ८० टक्क्यांदरम्यान आहे. दुसरा डोस ८० ते ७० टक्के आहे. राज्यात १२ कोटी ४४ लाख ३७ हजार एवढी लोकसंख्या लसीकरणासाठी पात्र आहे. त्यापैकी ९२.२१ म्हणजेच ८ कोटी ४३ लाख ०९ हजार ५०८ नागरिकांचा पहिला आणि ७५.५० टक्के म्हणजेच ६ कोटी ९० लाख ३० हजार २५७ नागरिकांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहे.
............................................
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या वाढू लागली आहे. चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आल्याने लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे. अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून लसीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- डॉ. सचिन देसाई, राज्य लसीकरण अधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81275 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..