
प्रदूषणाच्या नियमांची विकसकांना सक्ती
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ५ : शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवी मुंबई महापालिकेतर्फे लवकरच नवे धोरण राबवण्यात येणार आहे. हवेची गुणवत्ता खराब होण्यास कारणीभूत ठरणार्या बांधकाम साईट, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांची वाहतूक करणारी वाहने, रस्ते आणि पदपथावरील कामे आदींकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या घटकांना परवानगी देताना वायू प्रदूषण होऊ नये म्हणून नियमावली आखून देण्यात येणार आहे. या प्रकरणी नगररचना विभाग आणि डेब्रिज विरोधी पथकांना दंडात्मक कारवाईचे अधिकार महापालिका प्रशासनाकडून देण्यात येणार आहे.
नवी मुंबई शहराच्या हवेची गुणवत्ता अतिशय वाईट दर्जाची असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही हवेची गुणवत्ता खराब झाल्याचे नोंद झाली आहे. हवेची गुणवत्ता घसरण्यास फक्त रासायनिक द्रव्य आणि वायू सोडणाऱ्या कंपन्याच कारणीभूत नाहीत, तर शहरात उभा राहण्यात मोठमोठ्या इमारती, रस्ते, उड्डाणपूल, पदपथ आदी विकासकामांमधून धुलिकण वातावरणात मिसळतात. हवेची गुणवत्ता सुधारायची असल्यास या धुलिकणांना पायबंद घालावा लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी महापालिकेत ‘नॅशनल क्लीन प्रोग्रॅम’ अंतर्गत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालायचा असल्यास ज्या ठिकाणी धुळीची उत्पत्ती होते, त्याच ठिकाणी तिला प्रतिबंध करणे गरजेचे आहे, असे मत नोंदवण्यात आले. शहरातील पाडकाम आणि बेकायदा बांधकामांमधून निघणाऱ्या डेब्रिजची विल्हेवाट लावण्यासाठी उभारलेल्या प्रकल्पाची माहिती आणि त्याचे महत्त्व आयुक्त अभिजित बांगर यांनी उपस्थितांना पटवून दिले.
नवी मुंबई शहरात सध्या काही मोकळ्या जागांवर उंच उंच इमारतींचे बांधकाम सुरू आहे. सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग, पामबीच मार्ग आदी ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे सुरु असतात. या कामांमध्ये वापरण्यात येणारे बांधकाम साहित्यांच्या वापरातून धुळीचे साम्राज्य पसरते. या धुलिकणांमुळे शहराच्या हवेची गुणवत्ता खराब होते. अशा कामांमधून धुळीचे उत्सर्जन कमी करण्यासाठी नियम आखून दिले जाणार आहेत. तसेच इमारती बांधकाम करताना फक्त काम लपवण्यासाठी हिरव्या जाळीचा वापर न करता, प्रत्यक्ष बांधकाम साहित्यांचे धुळ हवेत मिसळू नये म्हणून पूर्ण बांधकाम अच्छादित होईल अशा पद्धतीने हिरवी जाळी लावण्याचे नियम महापालिकेतर्फे लावण्यात येणार आहेत. या नियमांचे अंमलबजावणी करण्याचे काम नगररचना आणि डेब्रिज विरोधी भरारी पथकांमार्फत केले जाणार आहे.
राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे हवेची गुणवत्ता सुधारणार
देशातील नामांकित शहरांच्या हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारतर्फे नॅशनल क्लीन प्रोग्रॅम राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत देशातील मोठ्या शहरांचे एअर क्वालिटी इंडेक्स मोजली जात आहे. यात नवी मुंबई शहराची हवा गुणवत्ता वाईट नोंद झाली आहे. देशातील सर्व शहरांची हवा शुद्ध करण्यासाठी विविध उपाय-योजना केल्या जाणार आहेत. तसेच उपाय-योजना करण्यासाठी केंद्रातर्फे वेगळा निधीची तरतूद करण्यात आली आहे.
धुलिकणाचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे विविध योजना आखल्या जात आहेत. त्यांचे उल्लंघन केल्यास त्यावर महापालिका दंडात्मक कारवाई करू शकते. बांधकाम करत असताना हिरवी जाळी लावली नाही, तर धुलिकण सर्वत्र पसरू शकतात. वाहतूक करताना वाहन चालकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. महापालिकेचे नगररचना विभाग व डेब्रिज भरारी पथकाला कारवाई करण्याचे अधिकार देण्यात येणार आहे.
अभिजित बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81278 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..