
होल्डिंग पॉँडमधील गाळ पुढच्या वर्षी काढणार!
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ५ : सिडकोतर्फे उभारण्यात आलेल्या होल्डिंग पॉँडच्या स्वच्छतेला अखेर पुढचे वर्ष उजाडणार आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नवी मुंबई शहरातील सीबीडी-बेलापूर, नेरुळ, वाशी, कोपरखैरणे आदी नोड पुन्हा पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता आहे. एमसीझेडएमए या सरकारी यंत्रणेने महापालिकेला गाळ काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने नेमलेल्या संस्थांना अभ्यास करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.
समुद्रसपाटीपासून खाली वसविण्यात आल्यामुळे नवी मुंबई शहराला पावसाळ्यात पुराचा धोका आहे. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी सिडकोने तयार केलेले होल्डिंग पॉँड (धारण तलाव) हे जणूकाही सुरक्षा कवच ठरले आहे. मात्र गेले अनेक वर्षे या होल्डिंग पाँडमधील गाळ न काढल्याने पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे. परिणामी वसाहतींमध्ये पूरसदृश परिस्थिती उद्भवत आहे.
गेले दोन पावसाळे कधी नव्हे, ते नवी मुंबई शहरात काही सखल भागात पाणी साठल्याचे निदर्शनास आले आहे. सीबीडी-बेलापूरमधील शेकडो घरे आणि दुकानांमध्ये पाणी जाऊन लोकांच्या मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे होल्डिंग पॉँड स्वच्छ करण्याची ओरड गेले अनेक वर्षे लोकप्रतिनिधींसहित नागरिकांकडून होत आहे. हे होल्डिंग पॉँड स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने काही महिन्यांपासून हालचाली केल्यानंतर वाशी आणि सीबीडी-बेलापूरचे होल्डिंग पॉँड स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात येणार होते. परंतु त्याआधी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी तसेच वन विभाग यांची परवानगी घेतल्याशिवाय गाळ काढून पाणी साठवणूक क्षमता वाढविणे शक्य नाही. एमसीझेडएमएकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. परंतु सखोल अभ्यास करून कांदळवनांना धक्का न लावता गाळ काढण्यासाठी कोणती यंत्रणा वापरणार आहेत, त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना एमसीझेडएमए यांनी महापालिकेला दिल्या आहेत. त्यानंतरच हा गाळ काढण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.
--------------------------------------------
गाळ काढण्यासाठी अभ्यास करणार
एमसीझेडएमए यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापालिकेतर्फे आय.आय.टी. मुंबई आणि सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी ॲण्ड नॅचरल हिस्टरी (सॅकॉन ) या दोन संस्थेमार्फत होल्डिंग पॉँडची प्रत्यक्ष पाहणी करून घेऊन प्राथमिक पाहणी अहवाल प्राप्त केला आहे. त्यानुसार पंप स्टेशनमधील यंत्रणांची क्षमता वाढवणे, फ्लॅप गेटच्या जागा बदलणे, पावसाळी पाण्याच्या मार्गातील अडथळे दूर करून जलप्रवाह वाहता करणे आदी महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. या दोन्ही संस्थांना गाळ काढण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी अंदाजे एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत यंदाच्या पावसाळ्यात सखल भागात पाणी साठू नये यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाय-योजना केल्या जाणार असल्याची माहिती शहर अभियंते संजय देसाई यांनी दिली.
-------------------------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81296 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..