
भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
पेण, ता. ५ (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील वडखळजवळ आज (ता. ५) सकाळी ९.३० च्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन गाड्यांच्या मध्ये चिरडून दोघांचा मृत्यू झाला. डॉ. सनोबर फातिमा जहीर आणि विनोद अरविंद सिंह अशी मृतांची नावे आहेत. दोघेही दोन वेगवेगळ्या दुचाक्यांवरून जात होते. त्या वेळी मागून येणाऱ्या मिनीबसने जोराची धडक दिल्यामुळे दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत वडखळ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी विभा चव्हाण आणि पोलिस निरीक्षक बाळा कुंभार हे करत आहेत.
पेण तालुक्यातील रामवाडी येथील डॉ. सनोबर फातिमा काझमी आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी असणारे विनोद अरविंद सिंह (वय २८) हे दोघे आपापल्या दुचाक्यांवरून जात होते. मुंबई-गोवा महामार्गावर शरयू ह्युंदाई शोरूमजवळ त्यांचा अपघात झाला. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक टेम्पो उभा केलेला होता. पेणहून येणारे डम्परचालक (क्र. एमएच ०६ बीडब्ल्यू ४०६५) मनीष चौहान यांना दुरून टेम्पोचा अंदाज आला नाही. त्यामुळे टेम्पोजवळ आल्यानंतर त्यांनी अचानक वाहनाची गती कमी केली. त्यामुळे त्यांच्या मागून येणाऱ्या दोन्ही दुचाक्यांना अचानक गती कमी करावी लागली, पण पाठीमागून येणारा मिनी बसचालक उमेश गमरे याला गती नियंत्रित न झाल्याने त्याने दोन्ही दुचाक्यांना जोराची धडक दिली. यामुळे दुचाक्या मिनीबस आणि डम्परच्या मध्ये चिरडल्या गेल्या व दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81299 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..