
लाल मिरचीचे भाव कडाडले
विक्रमगड, ता. ५ (बातमीदार) ः उन्हाळा सुरू झाला, की ग्रामीण भागातील गृहिणींना काळजी लागते ती घरातील मसाला-हळद, कांदा-लसूण-खोबऱ्याच्या साठवणुकीची. त्यातच ग्रामीण भागातील महिला या वर्षभर पुरेल, एवढ्या मसाला व हळदीची साठवणूक करून ठेवत असतात; मात्र या वर्षी सर्वच पदार्थांची भाववाढ झाली आहे. त्यात मसाला करण्यासाठी लागणाऱ्या लाल मिरचीचे भाव वाढल्याने गृहिणींचे घराचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
मसाला करण्यासाठी लागणाऱ्या सुकलेल्या लाल मिरचीचे भाव दुपटीने वाढले आहेत. दोन वर्षांपूर्वी १२०-१५० रुपये किलो दराने विकली जाणारी तिखट मिरची यावर्षी दुप्पट दराने विकली जात आहे. महाराष्ट्रात लाल मिरची आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा तसेच मध्य प्रदेशमधून येते. तिखट असलेली लवंगी मिरची २३०-२५० रुपये किलो, कमी तिखट असलेली पांडी मिरची २८०-३०० रुपये किलो, मसाल्याला लाल रंग येण्यासाठी वापरण्यात येणारी काश्मिरी मिरची ४७० रुपये किलो, शंकेश्वरी मिरची ३१०-३४० रुपये किलो, रस्सा जाड होण्यासाठी मसाल्यामध्ये टाकण्यात येत असलेली बेडगी मिरची ३४०- ते ३८० रुपये किलो, रेशम पट्टा मिरची ४०० ते ४५० रुपये किलो दराने विकली जात असल्याची माहिती विक्रमगडमधील व्यापाऱ्यांनी दिली.
मागील दोन वर्षांपूर्वीपेक्षा या सर्व मिरच्यांचे भाव १५० ते २०० रुपयांनी वाढले असल्याचे महिलांनी सांगितले. ग्रामीण भागात प्रत्येक घरी वर्षाकाठी सरासरी १२ ते १५ किलो मसाला बनवला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला या मोठ्या प्रमाणात सुकलेली लाल मिर्ची खरेदी करत असतात. सुकलेल्या लाल मिर्चीचा भाव वाढल्याने ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे महिलांनी सांगितले.
-------------
पावसाळ्याआधी दरवर्षी आम्ही मसाला साठवणूक करत असतो. दरवर्षी घरगुती मसाला बनवण्यासाठीच्या पदार्थांचे भाव वाढत चालेले आहेत. या वर्षी तर खूपच भाव वाढले आहेत. घरगुती मसाल्यापेक्षा आयता मसाला स्वस्तात मिळत असल्याने ग्रामीण भागात मसाला खरेदी करण्यास अधिक पसंती मिळू लागली आहे.
- वैशाली विजय सांबरे, गृहिणी, विक्रमगड
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81317 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..