
महामार्गावर सुसरी नदीवरील पुल धोकादायक
कासा, ता. ५ (बातमीदार) ः धानिवरी येथे मुंबई वाहिनीवरील पुलावर जोडणाऱ्या सांध्याजवळ रस्त्याच्या स्लॅबला काही महिन्यांपूर्वी भगदाड पडले होते. धानिवरी येथील सुसरी नदीवरील हा पूल महामार्ग विस्तारीकरणाच्या आधीपासून असल्यामुळे त्याकडे खास लक्ष देण्याची गरज आहे; मात्र हे भगदाड बुजवण्यासाठी महामार्गावरील ठेकेदार कंपनीने अभियांत्रिकी पद्धत न वापरता साध्या पद्धतीने ठिगळ लावण्याचे काम केल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ असल्यामुळे पुलाला हादरे बसत असतात. अशात पुलावरील खड्डा हा पूल जोडणाऱ्या सांध्याजवळ असल्यामुळे भविष्यात सांधा खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने वेळीच या पुलावरील खड्डा भरावा व अपघाताचा धोका टाळावा, अशी मागणी वाहनचालक करत आहेत. महामार्ग विस्तारीकरणाच्या आधीपासून आपले अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या जीर्ण पुलाची अभियांत्रिकी तज्ज्ञांकडून तपासणी करण्याची गरज आहे; अन्यथा मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
---
आम्ही आमच्या पद्धतीने महामार्गावरील अनेक कमतरता दाखवून देत आहोत. अपघात कमी होण्यासाठी अनेक उपाययोजनांची गरज आहे. या पुलाच्या खालील बाजूला गंज चढून काही भाग धोकादायक झाला आहे.
- हरबन्स सिंग नन्नाडे, पालघर जिल्हा वाहन चालक संघटना अध्यक्ष
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81318 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..